23 may 2024
अवैध सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुण उद्योजकाची आत्महत्या
नांदेड, दि. 22 : शहरातील अंबिकानगर भागात राहणार्या एका तरुण उद्योजकाने अवैध सावकारीच्या विळख्यामुळे आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. दरम्यान, व्याज आणि मुद्दल रकमेची परतफेड केल्यानंतरही त्यावर लावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेसाठी संबंधित व्यक्तीने तगादा सुरू केल्याने त्याच्या मानसिक त्रासाला आणि दिल्या जाणार्या धमक्यामुळे आत्महत्या करत असल्याचे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, रात्री उशिरा भाग्यनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर शहरात चालणार्या अवैध सावकारीच्या धंद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योजक समीर सुधाकर येवतीकर हा आपल्या आई, वडिल, पत्नी व लहान मुलगा यांच्यासोबत अंबिकानगर भागात राहत असे. समीर याचा आवळा कँडी बनविण्याचा व्यवसाय होता. त्याने धंद्यासाठी म्हणून काही वर्षांपूर्वी दिपक पाटील याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर आणखी काही रक्कम घेतली. परंतु, व्याजाचे पैसे वेळेवर दिले नसल्याने त्यावर दररोज एक हजार रुपये दंड म्हणून आकारल्या जात होता. कालांतराने दंडाची रक्कम 50 हजार रुपयाच्या जवळपास गेली. व्याज, दंडाची रक्कम आणि मुद्दलाची परतफेड केल्यानंतरही दिपक पाटील जास्तीच्या पैशासाठी तगादा लावत होता. चार-पाच दिवसाखाली त्याने मालेगाव रोडवरील एका फायनान्सच्या कार्यालयात नेऊन समीर येवतीकर यास पैशाची मागणी केली. दंडाची रकम आणि 80 हजार रुपये दे नाही तर
जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समीर याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पैसे परत करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागण्यात आला. परंतु, पैशाची व्यवस्था झाली नसल्याने आत्महत्येचे पाऊल उचलत असून, मला प्रचंड त्रास दिल्याचेही समीरने लिहिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बुधवारी सकाळी समीर याने आई-वडिलांना चहा करून दिल्यानंतर घराच्या वरच्या मजल्यावर गेला. तेथे त्यांनी छताच्या लोखंडी गजाळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या वेळी समीरचा लहान मुलगा मोबाईल आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला, त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. भाग्यनगर ठाण्याचे प्रभारी पो.नि. शेंडगे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
फायनान्स कार्यालयातून जप्त केली महत्त्वाची कागदपत्रे !
काही दिवसांपूर्वी समीर येवतीकर याला मालेगाव रोडवर असलेल्या एका फायनान्स कार्यालयात बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी नेमके काय घडले, हे समोर येऊ शकले नसले तरी, तेव्हापासून तो तणावग्रस्त झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पोलिसांनी दुपारी त्या फायनान्स कार्यालयात जाऊन तपासणी केल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच डायर्या जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. दिपक पाटील आणि त्या फायनान्सचा नेमका संबंध काय आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या फायनान्सचा मगुरुफ कोण आणि कुणाची मकृपाफ हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.