त्या’ सहा जणांसह १२ अहवाल निगेटिव्ह!

  • नागरिकांनी सोडला पुन्हा सुटकेचा नि:श्वास
  • जिल्ह्यात एकही पॉझीटिव्ह नाही: डॉ. विपीन

नांदेड, दि.३: दिल्लीच्या निजामोद्दिन येथील मर्कज तसेच अन्य ठिकाणाहून परतलेल्या १४ पैकी १२ जणांच्या घशाच्या द्रवाचे (स्वैब) नमुने निगेटिव्ह आले आहेत. ते सर्व अहवाल जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री उशिरा मिळाले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे.

दिल्लीच्या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली असताना प्रशासनही मानसिक तणावाखाली वावरत होते. परंतु १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचे संकट पुन्हा एकदा टळले आहे. असेच पुढे सुरू राहू द्यायचे असेल तर कोणीही घराबाहेर पडू नये. सुरक्षित राहावे आणि सर्वांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

नवी दिल्लीतील निजामोद्दीन येथील तबलिकी जमातने आयोजित केलेल्या मर्कज कार्यक्रमासाठी नांदेडहून काही लोक गेले होते. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ते परतले. जमातच्या कार्यालयात थांबलेल्या सुमारे दोन हजार नागरिकांना दिल्ली पोलिसांनी बाहेर काढले. त्यावेळी एका वृद्धाचा मृत्यू व ३०० जण कोरोना संसर्गाने संक्रमित आल्याचे पुढे आले.

मर्कजमधील सुमारे एक हजार नागरिक कोरोंटाईन असून त्यात ४०० विदेशी नागरिकांचा संमावेश आहे. त्यामुळे हे केंद्र कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरले आहे. या घटनेशी संबधित रुग्णांची मोठी संख्या लक्षात घेता येथून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या देशभरातील धर्म प्रचारकांना शोधण्याचे काम प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात सुरू झाले आहे.

नांदेडला २६ जण दिल्लीहून दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे शोध घेतला असता जिल्ह्यात वास्तव्य करणारे केवळ १४ जण असल्याचे समजले आणि त्या सर्वांना पकडून आणून त्यांचे स्वब घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात पाठवलेल्या आठ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

गुरुवारअखेर शासकीय रुग्णालयातुन एकूण 105 रुग्णांचे स्वब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 86 नमुन्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी निगेटिव्ह आला आहे, 14 नमुन्याचा अहवाल प्रलंबित होता. तो शनिवारी येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके यांनी आरोग्य विभागाचा संपर्कात राहून शुक्रवारी रात्रीच अहवालाची माहिती मिळवली.

दोन जण अजूनही बेपत्ताच!

दुसऱ्या टप्प्यातील १४ पैकी १२ नमुने निगेटिव्ह आले असून उर्वरित दोन अहवालाची प्रतीक्षा आहे. दिल्लीच्या यादीतील एकाचा शोध लागत नाही आणि एक जण दुसऱ्याचे सिम कार्ड घेऊन फिरतो आहे. त्यामुळे या दोघांना पकडून त्यांचे घशाच्या द्रवाचे नमुने व अहवाल तत्काळ घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

१४६ रुग्णांचे विलगीकरण

शासकीय रुग्णालयात नोंद झालेल्या 386 रुग्णांपैकी 146 रुग्णांचे विलीगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात आज दि.3 एप्रिलपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

हिंगोलीत इतर संशयित निगेटिव्ह

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी एक कोरोनाबाधित व्यक्ती निघाल्यानंतर प्रशासकीय व्यवस्था सावध झाली. हा व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला, त्यांना होम कोरोटाईन केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील इतर चारही संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बाधित व संपर्कातील रुग्णास कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!