कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी अन्नधान्याचे वितरण

नांदेड दि. 3 :–  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना तीन महिन्‍यांचा शिधा एकत्रितरित्‍या उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. परंतु आता शासनाने असा निर्णय घेतला असून एप्रील, मे व जून 2020 साठी अन्‍नधान्‍याच्‍या दिलेल्‍या नियमित

नियतनानुसारअंत्‍योदय कार्ड धारकांना 23 किलो गहू, 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्‍य व प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए.पी.एल. शेतकरी यांना प्रति व्‍यक्‍ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो (सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्‍या-त्‍या महिन्‍यात करण्यात येणार आहे.

माहे एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्‍याचेवरील प्रमाणे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना ज्‍यामध्‍ये प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति सदस्‍य प्रतिमाह 5 किलो तांदुळ (मोफत) त्‍याचबरोबर अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांना शिधापत्रिकेतील सदस्‍य संख्‍येनुसार प्रति सदस्‍य 5 किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्‍यात येणार आहे. सदरचे दोन्‍ही प्रकारचे वाटप PoS मशीन मार्फत होणार आहे. साधारणतः प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या पंधरवडयामध्‍ये विहीत दराने (गहू 2 रुपये किलो, तांदुळ 3 रुपये किलो) वाटप झाल्‍यानंतर दुसऱ्या पंधरवडयामध्‍ये मोफत धान्‍याचे वितरण होणार आहे.

याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!