पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अनिल रामोड

डॉ. अनिल रामोड

नांदेडच्या भूमिपुत्राला पुन्हा मिळाली संधी

नांदेड, दि.२३: नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. अनिल रामोड (आयएएस) यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. रामोड हे सध्या लातूरच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून काही दिवसापूर्वीच केंद्र शासनाने त्यांचा भारतीय प्रशासकीय संवर्गात समावेश केला होता. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

डॉ.अनिल रामोड यांनी नांदेड व परभणी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त, औरंगाबाद येथे म्हाडाचे मुख्य अधिकारी यासह विविध पदांवर यापूर्वी काम पाहिले आहे.
दोन महिन्यापूर्वी राज्यातील काही महसूल अधिकाऱ्यांचा केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय संवर्गात समावेश केला, त्यात नांदेडच्या डॉ. अनिल रामोड यांचेही नाव होते. शासनाने त्यांची पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. योगायोगाने आधीचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हेदेखील नांदेडचे भूमिपुत्र या पूर्वी त्या पदावर होते. शासनाने त्यांना पुण्याच्या विभागीय आयुक्तपदाचा पदभार दिला होता आणि डॉ. म्हैसेकर हे विभागीय आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले असून सध्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्यापाठोपाठ अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर डॉ. अनिल रामोड यांच्या माध्यमातून पुन्हा नांदेडच्या भूमिपुत्राला संधी मिळाली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!