नांदेडच्या दसरा मिरवणुकीला सशर्त परवानगी!

  • गुरुद्वारा बोर्डाला हायकोर्टाचा दिलासा
  • हमीपत्र द्या, नियम आणि वेळेचे बंधन पाळा
  • राज्य शासनाने दिला होता नकार

गोविंद करवा

नांदेड, दि.२३: गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज शुक्रवारी सशर्त परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी नाकारल्यानंतर गुरुद्वारा बोर्डाने दाखल केलेल्या तातडीच्या रीट याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने अटी व शर्ती घालून दिल्या असून त्याच्या पालनाची जबाबदारी याचिकाकर्ते व गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्रसिंघ बुंगई यांच्यावर टाकली आहे. पोलिस व प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे तसेच मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करावे, असेही उच्च न्यायालयाने बजावले आहे. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व श्रीकांत कुलकर्णी यांच्या संयुक्त पीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला.

नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराच्या दसरा मिरवणुकीला तीनशे वर्षाची परंपरा आहे. परंतु कोविड-१९ अधिसूचनेमुळे यावर्षी दसरा मिरवणुकीला परवानगी मिळत नसल्याने गुरुद्वारा बोर्डाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यावर कोविड अधिसूचनेवरील सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन सचिवांकडे नवीन विनंती अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले. त्यावर शासनाकडे झालेल्या २० ऑक्टोंबर रोजी सुनावणीदरम्यान नांदेडचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलिस अधीक्षकांनी मिरवणुकीस परवानगी देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर शासनाने गुरुद्वारा बोर्डाची विनंती फेटाळून लावली.

शासनाच्या या आदेशाविरुद्ध गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सचिव रवींद्रसिंघ बुंगई यांनी ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लगेच रिट याचिका दाखल करून वेळ कमी असल्याने तातडीने सुनावणीस घेण्याची विनंतीही केली. याचिकेच्या विरुद्ध राज्य सरकारच्या वतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील आणि उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील यांनीही बाजू मांडली.

देशभरात अनेक धार्मिक उत्सवाला परवानगी दिली. केंद्र सरकार परवानगीच्या बाजूने आहे, मग राज्य सरकार का विरोध करीत आहे, असा युक्तिवाद गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राजेंद्र देशमुख यांनी केला. राज्यात काही धार्मिक उत्सवांना राज्य शासनाने परवानगी दिल्याचेही निदर्शनास आणतांना, वाटेल तितक्या अटी शर्ती टाका, परंतु ३०० वर्षाची परंपरा मोडू नका, अशी मागणी राजेंद्र देशमुख यांनी केली.

दोन्ही बाजूकडून तासभर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीस सशर्त परवानगी देण्यास मान्यता दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ३०० वर्षाची दसरा मिरणुकीची परंपरा कोविड प्रादुर्भाव काळातही खंडित होणार नाही. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाला दिलासा मिळाला असून शीख धर्मियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख गुरुद्वारा बोर्डाची बाजू मांडली. त्यांना अँड. देवांग देशमुख यांनी सहकार्य केले.

अटी व शर्ती अशा:

दसरा मिरवणूक दोन उघड्या ट्रकमधून काढता येईल. दोन्ही ट्रकवर निश्चित केलेल्या व्यक्तीपेक्षा इतर कोणीही सहभागी होणार नाही. मिरवणुकीत पायी कोणीही सहभागी होणार नाही. याचिकाकर्ता यांना मिरवणुकीवर सनियंत्रण ठेवावे लागेल. मिरवणुकीचा मार्ग अडीच किलोमीटर ऐवजी पावणे दोन किलोमीटर राहील. मिरवणूक सुरू करून संपविण्याचा कालावधी दीड तासापेक्षा अधिक नसेल. गर्दी होऊ नये तसेच नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र सचिव बुंगई यांना प्रशासनाकडे द्यावे लागेल. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर व्यक्तिशः असेल. अटी शर्तीचा भंग झाल्यास याचिकाकर्त्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. पोलिस आणि प्रशासनाने आवश्यक ती सुव्यवस्था राखली पाहिजे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींच्या कोविड व आवश्यकतेनुसार इतर चाचण्या करणे व सर्व जण कोविड विषाणू संसर्गमुक्त असल्याची खात्री करणे बंधनकारक राहील.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!