मंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण आमदारांना मिळाले मध्यरात्री!

सेना आ. कल्याणकर भडकले
मंत्र्यांना मध्यस्थी करण्याची वेळ
प्रशासनाने केली सारवासारव

नांदेड,दि.19ः मंत्र्यांची आढावा बैठक सकाळी 8 वाजता, त्यासाठी लोकप्रतिनिधींना निमंत्रण मध्यरात्री… असा काहीसा गोंधळ रविवारी प्रशासकीय पातळीवर झाल्याचे पहावयास मिळाले. साहजिकच बैठकीचे निमंत्रण उशीरा मिळाल्यामुळे नांदेड उत्तरचे शिवसेना आ. बालाजी कल्याणकर चांगलेच भडकले. बैठक सुरू असतानाच त्यांनी आपला संताप व्यक्त केल्यामुळे खुद्द मंत्र्यांना मध्यस्थी करत आमदारांची समजूत काढावी लागली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि.19) सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या दौर्‍याआधी राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री व विजय वडेट्टीवार यांनी नागपूर ते सोलापूरच्या प्रवासादरम्यान, रविवारी नांदेडचा धावता दौरा केला. शनिवारी रात्री उशीरा नांदेड मुक्कामी आल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, सा.बां. मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांची या वेळी उपस्थिती होती.
दरम्यान, नांदेड उत्तरचे सेना आ. बालाजी कल्याणकर बैठकीला उशीरा आले. प्रशासनाकडून बैठकीचा निरोप उशीरा मिळाला त्यामुळे वेळेवर येता आले नाही, असे सांगत ते संबंधित अधिकार्‍यांवर चांगलेच भडकले. रात्री 12 वाजता फोन करणे कितपत योग्य आहे. मंत्र्यांचा दौरा एक दिवस आधी जाहीर झाल्यानंतरही बैठकीचा निरोप रात्री उशीरा का देण्यात आला, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे बैठक मध्येच थांबवून मंत्री विजय वडेट्टीवार यांना आ. कल्याणकर यांची समजूत काढावी
लागली. प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाअभावी हा गोंधळ झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु, याच सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना आलेला हा अनुभव निश्चितच आघाडीत बिघाडी होण्यास काहीअंशी का होईना, कारणीभूत ठरू शकतो. काँग्रेसच्या आमदारांना मात्र निमंत्रण वेळेवर मिळाले होते काय, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. तसे झाले असेल तर याबाबतीत सेना आमदारांच्या बाबतीतच असे का व्हावे, असाही सवाल केला जात आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!