नांदेडच्या प्रयोगशील व वंचित जनतेचा आवाज हरपला..

आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहकेंद्रसंचालक भीमराव शेळके यांचे निधन

भीमराव शेळके

नांदेड, दि.२१: आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहकेंद्रसंचालक भीमराव शेळके (वय६३) यांचे आज मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. दोन वर्षापूर्वीच नांदेड आकाशवाणी केंद्रातून ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते.

नांदेड आकाशवाणी केंद्राच्या उभारणीपासून भीमराव शेळके हे नेहमी प्रयोगशील राहिले आहेत. ग्रामीण भागात जाऊन लोकांशी बोलणे, त्यांना बोलते करणे, त्यांचे अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहचवून शेती व उद्योगाचे नवे प्रयोग राबविण्यास उद्युक्त करणे, असा त्यांचा जणू छंद राहिला. आकाशवाणी म्हणजे सरकारचे नियंत्रण असलेली संस्था ही ओळख पुसून त्यांनी जास्तीत जास्त लोकांना व्यासपीठ निर्माण करून देत जनतेची संस्था असल्याची भावना श्रोत्यांमध्ये रुजवली.

आकाशवाणी केंद्रात आमंत्रित करून भीमराव शेळके यांनी अनेकांना बोलते केलें त्यांचे अनुभव इतरांपर्यंत पोहचवून चांगल्या उपक्रमासाठी श्रोत्यांना प्रेरित केले.

आकाशवाणी केंद्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून भीमराव शेळके यांनी श्रोत्यांच्या मनात स्वतःचे आणि आकाशवाणीचे अढळ स्थान निर्माण केले. अनेक पत्रकार त्यांनी उभे केले. नवोदित पत्रकार, कलावंत, लेखक यासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लहान मोठ्या व्यक्तिंपासून ते शासकिय अधिकारी कर्मचारी यांना आकाशवाणीच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. यातून शासन, समाज आणि जनता यांच्यातील संवाद वृद्धिंगत करण्यास मोठी मदत झाली.

ग्रामीण भागात, विशेषत: शेतकरी हा आकाशवाणीचा मोठा श्रोतावर्ग असल्याने कृषी व कृषी आधारित कार्यक्रम घेण्यावर शेळके यांचा भर होता.

नांदेड जिल्ह्यातील घटना व घडामोडींचा आढावा घेणारे नांदेड दर्पण या बातमीपत्रवजा कार्यक्रमाचे प्रसारण त्यांनी सुरू केले. दररोज सकाळी ७ वाजता एकत्रित घडामोडी ऐकण्यासाठी घराघरातील रेडिओ सुरू राहत होते. त्याला प्रचंड लोकप्रियता व नांदेड आकाशवाणीला वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. या कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर आकाशवाणीवर जाहिराती देणाऱ्यांचा ओघही त्यामुळे वाढला. शेळके यांच्या सेवानिवृत्तीच्या दरम्यान दुर्दैवाने हा कार्यक्रम बंद पडला. भीमराव शेळके यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात प्रजावाणी परिवार सहभागी आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!