नांदेडला कोरोनाची अँटीजेन टेस्ट प्रथमच सुरू!

RTPCR आणि अँटीजेन चाचण्यांमध्ये फरक काय?

….गोविंद करवा

नांदेड, दि. १९: मुंबई, पुणे आणि औरंगाबादपाठोपाठ नांदेडमध्येही रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याच्या कारणावरून हॉटस्पॉट परिसरात अँटीजेन चाचण्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये ज्या एक लाख टेस्टिंग किट उपलब्ध झाल्या, त्यातील काही किट शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शनिवारी या टेस्टिंगचा पहिला प्रयोग नांदेड शहरात झाला.

नांदेड जिल्ह्यात मागील नऊ दिवसात नवीन कोरोनाबाधितांची संख्या तीनशेच्या आसपास झाली. काही विशिष्ट ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. या सर्वांच्या लाळेचे (थ्रोट स्वब) नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून अहवाल येण्यासाठी वेळ आणि अधिक खर्च येत असल्याने कमी खर्चात झटपट अहवाल आणि तात्काळ उपचार सुरू करण्यासाठी अँटी जेन टेस्ट प्रणाली वापरण्यास शनिवारपासून (दि.१८) सुरूवात करण्यात आली आहे.

लक्षणेधारक निगेटिव्हची होणार RTPCR चाचणी!

पहिल्या दिवशी घेतलेल्या १०८ टेस्ट मधील पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. उर्वरित संशयितांपैकी ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, त्यांना सर्दी, खोकला, डोकेदुखी किंवा ताप अशी लक्षणे असल्यास, त्यांचे थ्रोट स्वब RTPCR प्रणालीत तपासणीसाठी पाठवले जातील. तिथेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास संशयितांना घरी जाण्यासाठी सुटी दिली जाईल. परंतु, ज्यांना लक्षणे नाहीत, अशा संशयितांना बाधित रुग्ण संपर्काची हिस्ट्री असल्याने त्यांना पुढील काही दिवस होम क्वारंटाईन राहण्यासाठी सांगितले जात आहे.

अँटीजेन टेस्ट कशी होते?

ही चाचणी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी खबरदारी घेऊन झटपट करता येते. मोठ्या संख्येने ही चाचणी घेणे शक्य आहे. चाचणीचा निष्कर्ष काही मिनिटांत कळतो. यात नाकातून नमुना घेतला जातो. अँटीजेन म्हणजे शरीरात बाहेरून आलेल्या घटकाला विरोध करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती विकसित होणे, अँटीजेन निर्माण होणे. यात निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला क्वारंटाइन करतात. सकस आहार, विश्रांती आणि आवश्यकता भासल्यास रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी औषधे देऊन अशा रुग्णांवर उपचार शक्य आहेत. या चाचणीत पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला बाकी कोणताही त्रास नसल्यास होम क्वारंटाइन (घरी एका खोलीत स्वतंत्र राहण्याची व्यवस्था) अथवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन (सरकारी केंद्रात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था/संस्थात्मक विलगीकरण) केले जाते. तब्येत सुधारली आणि काही दिवसांनी पुन्हा बिघडली तर अँटीबॉडी चाचणी केली जाते. तब्येत जास्त बिघडली तर थेट आरटीपीसीआर चाचणी केली जाते. आरटीपीसीआरचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आला तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. दक्षिण कोरियाच्या बायोसेन्सर्स कंपनीने ही टेस्ट बनविली आहे. याची किंमत 450 रुपये आहे.

अँटीजेन्स म्हणजे काय?
शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स हे विषाणूंचा एक भाग असतात. आपले शरीर या अँटीजेन्सना बाहेरून आलेला घटक म्हणजेच फॉरेन बॉडी म्हणून ओळखतात. हा घटक शरीरातला नसल्याचे आपल्याला कळते. अँटीजेन टेस्टमध्ये घेतल्या जाणाऱ्या थ्रोट स्वॅबमध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही, हे चाचणीच्या अहवालातून समजते.
त्यावर उपाय म्हणून मानवी रक्ताच्या पेशीतले लिंफोसाईट्स नावाचे घटक अँटीबॉडीजची निर्मिती करतात. या अँटीबॉडीजचा आकार हा त्या अँटीजेन्सना सामावून घेईल किंवा त्यांना आपल्याशी जोडून घेईल अशा पद्धतीचा असतो.

आरटीपीसीआर चाचणी म्हणजे काय?

या चाचणीस इंग्रजीत Realtime Reverse Transcription- Polymerase Chain Reaction) असे म्हणतात. कोरोना झाला आहे नाही, याचे अचूक निदान करणारी ही चाचणी आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व चाचण्या याच पद्धतीने झाल्या, तसेच पुढील बहुतांश चाचण्यादेखील याच प्रणालीतून होणार आहेत. या चाचणीचे निष्कर्ष ४-५ तासांत मिळतात. पण नमुन्यांची तपासणी करणाऱ्यांवर येत असलेल्या ताणामुळे काही ठिकाणी निष्कर्ष कळण्यास वेळ लागतो. या चाचणीसाठी नाकातून अथवा घशातून नमुना घेतला जातो. ही चाचणी प्रयोगशाळेतच घेता येते. नमुना घेण्याची तसेच तपासण्याची प्रक्रिया पुरेशी खबरदारी घेऊन केली जाते. यात Ribonucleic acid अर्थात आरएनए (RNA) तपासले जाते. चाचणीचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आला तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत ४५०० रुपये आणि निवडक सरकारी प्रयोगशाळांमध्ये २५०० रुपये असा खर्च येतो.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!