नांदेडचे माजी जिल्हाधिकारी धीरजकुमार राज्याचे कृषी आयुक्त!


” राज्यातील ‘फार्मर्स’साठी तीन ‘फार्म’चा प्राधान्यक्रम “

….गोविंद करवा

नांदेड, दि.१७: नांदेडचे माजी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची राज्याच्या कृषी आयुक्त पदावर नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. उत्तरप्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील रक्कम वापरली नसल्याचा मुद्दा पुढे आणून त्यांनी योगी सरकारची कोंडी केली होती. प्रतिनियुक्तीवरून परतल्यानंतर शासनाने त्यांच्याकडे कृषी विभागाचे आयुक्तपद दिले आहे.

धीरजकुमार हे २००५ च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी असून २०१२ ते २०१५ या कालावधीत नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध अभियानात आपले योगदान दिले. कामात कर्तव्यकठोर असलेले धीरजकुमार हे अनेक बाबतीत संवेदनशील होते. २०१४- १५ साली शासनाने त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने गौरविले. नांदेडहून भंडारा येथे बदली झाल्यानंतर त्यांनी २०१६ ते २०१८ दरम्यान राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून काम केले. प्रतिनियुक्तीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर राज्य शासनाने त्यांची कृषी विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

राज्याच्या ‘फार्मर्स’साठी काम करताना रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरीचे मूल्यमापन) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) या तीन ‘फॉर्म’मध्ये मी माझा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रातील सुधारणांचा अभ्यास करून चांगल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करून कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यावर आपला भर असेल, असे धीरजकुमार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अजेंडानुसार कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने या क्षेत्रात विपणन ते उत्पादनापर्यंत वेग वाढविला आहे. कृषी उत्पादनच नव्हे तर उत्पन्न वाढवण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. कृषी उद्योग कंपन्यांना उत्पादनासाठी पाठबळ देणे, इनपुट वितरण सुलभ करणे, बाजार समित्यांचे डिजिटलायझेशन करणे आणि शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी मोठ्या बाजारपेठेशी जोडणे अशा कामांना आपली प्राथमिकता असेल, असेही धीरजकुमार यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे एक अतिवृष्टीयुक्त कृषी राज्य म्हणून ओळखले जात असल्याने राज्यात होणा-या अनिश्चिततेच्या पावसापासून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. कृषी क्षेत्रात उत्पादनपूर्व उत्पादन, प्रत्यक्ष उत्पादन आणि उत्पादनानंतरचे उत्पादन अशा तिन्ही विषयात एकत्रित तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या योजनेवर आपण काम करीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

(धीरजकुमार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ)

योगी सरकारची केली होती कोंडी!
धीरजकुमार हे आपल्या मूळ रहिवासी राज्यात, उत्तरप्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर त्यांची तेथील शासनाने सामाजिक विकास विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती केली. या दरम्यान त्यांच्याकडे पणन विभागाच्या संचालकपदाचीही सूत्रे होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्या संस्थेचे अध्यक्ष होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दिलेले १७०० कोटी रुपये खर्च झाले नसल्याचा मुद्दा पुढे आणून धीरजकुमार यांनी योगी सरकारची कोंडी केली होती. त्यामुळे उत्तरप्रदेशात ते फार काळ मानवले नाहीत आणि महाराष्ट्रात परतले. योगींची कोंडी केल्याचा मुद्दा येथे ‘फल’दायी ठरला आणि राज्यात त्यांची थेट कृषी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!