महापालिकेचा अर्थसंकल्प ‘ऑनलाईन’ मंजूर!

  • आरोग्यासाठी ३३ टक्के निधी राखून ठेवा: उपमहापौर
  • स्थायी समिती सभागृहातून महापौरांचे संबोधन
    नांदेड, दि.१६:मंजुरीनंतर साडेचार महिने स्थायी समितीकडे पडून राहिलेला अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या तहकुबीच्या विशेष अर्थसंकल्पीय ऑनलाईन सभेत दुरुस्ती व सुधारणेसह मंजूर करण्यात आला. तंत्रज्ञांची साधने उपलब्ध असतानाही ही सभा नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली नव्हती.
    स्थायी समिती सभागृहातून झालेल्या सभेच्या कामकाजाच्या वेळी महापौर दीक्षा धबाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह महापालिकेचे काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते. उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते क्वारंटाइन असल्याने त्यांनी घरूनच ऑनलाईन उपस्थिती लावून आपले मनोगत व्यक्त केले. अन्य सदस्य देखील ऑनलाईन उपस्थित होते. १३ जुलैला झालेल्या सभेत काही नगरसेवक प्रतिनिधींनी उपस्थिती लावल्याची वाच्यता झाल्यानंतर तो प्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी मागच्या वेळीप्रमाणे ऑनलाईन उपस्थिती न लावता सभागृहात उपस्थिती लावली.
    सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सभा अडीच तास चालली. सभेदरम्यान नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा अडथळा येत होता. तेव्हा सभा कामकाजाचे इतिवृत्त लिहिणाऱ्या व्यक्तींकडून मोबाईलवर संपर्क साधून त्यांची मनोगत टिपून घेतल्याचे काही सदस्यांकडून समजले.
  • शासनाने १३ मार्च रोजी कोविड १९ उपाययोजनेसाठी अधिसूचना काढून काही बंधने आणली होती. त्यापूर्वीच आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प १७ मार्चच्या सभेत स्थायी समितीने मंजूर केला. तेव्हाच बंधने येण्याची शक्यता लक्षात घेता २२ मार्चच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशीच विशेष सभा घेऊन अर्थसंकल्प सादर करता आला असता. पण सभापतींनी तसे पत्र त्यावेळी महापौरांना दिले नसल्याने मंजूर झालेला अर्थसंकल्प नगरसचिव यांच्या कार्यालयातच पडून होता.
  • अर्थसंकल्प त्याच वेळी सभेत सादर झाला असता तर लॉक डाऊनच्या चार महिन्याच्या कालावधीत नगरसेवकांना त्यावर अभ्यास करायला वेळ मिळाला असता. पण असे झाले नाही. शेवटी शासन पत्रानंतर गेल्या १३ जुलै रोजी अर्थसंकल्पाची सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभा सुरू होण्यापूर्वीच अर्थसंकल्प सर्व सदस्यांना घरी पाठविण्यात आला होता. स्थायी समिती सभागृहात तो सभेसमोर ऑफलाईन सादर करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. सदस्यांना अभ्यासासाठी केवळ तीन दिवसांचा वेळ दिल्यानंतर तहकूब केलेली ती सभा पुन्हा ऑनलाईन घेण्यात आली. विद्यमान महापौर व उप महापौर यांच्या कालावधीतील ही शेवटची सभा ठरली आहे. या सभेत दोन मिनिटात भाषण संपवण्याचे बंधन सदस्यांवर आणले गेले. त्यावरचा आक्षेपही निरर्थक ठरला. उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी ऑनलाईन सहभाग घेतानाच मानोगताचे लेखी पत्र महापौरांच्या कार्यालयात आधीच पाठविण्याचे सोपस्कार पूर्ण केले. राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेनेही ३३ टक्के स्वनिधी आरोग्यासाठी राखून ठेवण्याचे त्यांनी सुचविले. सर्वांच्या मनोगताची नोंद घेऊन अर्थसंकल्प मंजूर केल्याची घोषणा महापौरांनी केली.
अर्थसंकल्पीय सभेस मनपा स्थायी समिती सभागृहात उपस्थित महापौर, आयुक्त व इतर अधिकारी

जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला सभागृहाचा विसर!
मागील दीड दशकात महापालिकेच्या जवळपास सर्वच सर्वसाधारण सभा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह किंवा मनपा इमारतीतील चौथ्या मजल्यावरील शंकरराव चव्हाण सभागृहात झाल्या आहेत. १३ जुलै रोजी शंकररावजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेली सभा मात्र या दोन्हीपैकी एकाही सभागृहात न घेता मनपाच्या इमारतीतच असलेल्या स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. तहकूब सभादेखील पुन्हा त्याच ठिकाणी घेण्यात आली. ज्येष्ठ नेते व नांदेडचे पहिले नगराध्यक्ष शंकररावजी चव्हाण यांच्या नावाने असलेल्या सभागृहात तांत्रिक सुविधा नसेल तर ती उपलब्ध करता आली असती. पण शताब्दी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीत त्याचे औचित्य पाळले गेले नसल्याची खंत आता व्यक्त केली जात आहे. ऑनलाईन सभा घेण्याचा कायदा नाही. शासनाच्या एका पत्राच्या आधारे हे सोपस्कार पार पाडले. अशा परिस्थितीत ९०० च्या आसपास आसनक्षमता असलेल्या मनपा मालकीतील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ही सभा शारीरिक अंतर राखून पार पाडणे सहज शक्य होते. यानिमित्त यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी चित्रफीतही सर्वांना एकत्र पाहून गौरवपर भाषणे करता आली असती. पण कोणालाही याबाबत कसे सुचले नाही, याचे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपमहापौर सतीश देशमुख यांनी घरूनच ऑनलाईन सभेला उपस्थिती लावली.
Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!