कोरोनाग्रस्त उपमहापौरांचा रुग्णालयातून ऑनलाईन संवाद सुरू!

  • कोरोना जीवनचक्र थांबवू शकत नाही
  • काळजी घेतली आणि साखळी तोडली

गोविंद करवा
नांदेड, दि.९: कोरोनाग्रस्त झाल्याने उपचार सुरू असताना उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी रुग्णालयातील बेडवरून ऑनलाईन साधनाच्या माध्यमाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. यानिमित्ताने सर्वांनाच त्यांच्याशी थेट संवाद साधायला मिळाला, विचारपूस करता आली आणि प्रत्यक्ष भेटीचे अंतरही कमी झाले. कोरोनासारखा संसर्गजन्य आणि जीवघेणा आजार आपल्या नित्य ऋतूचक्रात मोठे अडथळे आणू शकत नाही, हे यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आले आहे.

उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल चार दिवसापूर्वी कळाला. परंतु, त्याआधी आठ दिवसांपासून ते संस्थात्मक विलगीकरणात राहिले. परिणामी, त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्ती म्हणून कुटुंबातील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अस्वस्थ वाटत असल्याने तसेच ताप दिसून आल्याने त्यांनी तपासणी करून घेतली तेव्हा दोन वेळा अनिर्णित आलेला अहवाल तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला.

बाधित झाल्याची वार्ता कळाल्यानंतर घाबरून न जाता त्यांनी पुढील काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार असल्याची तयारी करून घेतली. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने दै नं दिन कामकाजातील व्यत्यय कमी करण्याचाही चंग बांधला. प्रत्यक्ष भेटीतून होणारी कामे मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून करण्याचे ठरविले. प्रभागातील नागरिकांशी चर्चा करणे, महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद, कागदपत्रे हवी असल्यास किंवा पाठवायची असल्यास व्हॉटसअप किंवा ई-मेलवर पाठवून त्याचा पाठपुरावा करीत आहेत.

आपल्या सध्याच्या अनुभवाबाबत ‘प्रजावाणी’शी मोबाईलवर बोलताना म्हणाले की, संपर्कातील व्यक्ती बाधित निघाल्याचे कळाल्याच्या क्षणी सर्वात प्रथम अज्ञातवासात, म्हणजे क्वारंटाईनमध्ये गेल्यास कोरोनाची साखळी सहज तोडता येते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. हा आजार संसर्गजन्य असला तरी लोकांचे जीवन चक्र थांबवू शकत नाही. आज मी कुटुंबीयांना, लोकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही. पण तंत्रज्ञानाची साधने विकसित झाल्याने हा दुरावा देखील संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा गुगल मिट, झूम सारख्या अॅपच्या माध्यमातून मी एकाच अनेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉटसअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रत्येकाशी थेट बोलू शकतो. ऑनलाईन किंवा ई पेमेंट सारख्या अॅपने व्यवहार करू शकतो. कोरोनाने जीवनचक्रात केलेला बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय नसला तरी, त्यातून निर्माण झालेल्या संकटाचा संधी म्हणून शोध घेण्याचे आता प्रत्येकाने शिकले पाहिजे. तंत्रज्ञानाची साधने येऊन आपल्याकडे बरीच वर्ष झाली. पण त्याचा इतका उपयुक्त वापर झाल्याचे कधी पाहायला मिळाले नाही. आपणही त्याकडे कधी लक्ष दिले नाही. पण आता आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून इतरांशी थेट संपर्क टाळण्याची कला कोरोना संपेपर्यंत तरी सर्वांनी शिकून घेण्याची गरज आहे.

आपण बाधित निघाल्याचे कळाल्यानंतर कुटुंबातील लोक व हितचिंतकांना धक्का बसला. पण, मागील इतर रुग्णांचे अनुभव सांगून मीच त्यांना धीर दिला. मी स्वस्थ आहे. या आजाराने मला काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्यासाठी भाग पाडले, इतकाच अर्थ मी त्यातून काढत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी दिनचर्या पाळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर सर्वांची प्रत्यक्ष भेटल्याचे जाणवले आणि बरे वाटले. असे प्रयोग कोरोनाच्या इतर रुग्णांनी केल्यास काहीच हरकत नसावी. या संसर्गजन्य आजाराने एकमेकांमधील निर्माण केलेले अंतर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कमी करू शकतो, याची खात्री पटल्याने रुग्णालयाच्या आयसोलेशन बेडवरून माझे दैनंदिन काम ऑनलाईन स्वरूपात मोबाईलवरून सुरू आहे, असेही देशमुख म्हणाले. काही दिवसात बरा होऊन घरी परत येईल. पण पुढील काही दिवस कोणाच्याही संपर्कात येणार नाही. त्यामुळे भेटीचा मोह सर्वांनी टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!