जुना मोंढा भागात सोशल डिस्टसिंगचा फज्जा!

  • ठोक व किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी
  • परिसरातील नागरिकांना प्रचंड मनःस्ताप
  • मनपाचे फिरते पथक गेले कुठे ?

नांदेड,दि.7ः जुना मोंढा ही शहरातील मुख्य बाजारपेठ मानली जाते. दररोज लाखो रूपयांची उलाढाल येथे होत असते. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करण्यासाठी व्यापार्यांना शासनाने काही नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी दिली. पण, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी आपला व्यवसाय करताना कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. याकडे मनपा, जिल्हा प्रशासनही डोळेझाक करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत चिंता वाढली आहे.
नांदेड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुख्यत: जुन्या नांदेड भागात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याच भागात जुना मोंढा येथील ठोक व किरकोळ व्यापारी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. आपल्या दुकानात कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर ठेवल्याचे आढळत नाही. बरेच ग्राहक मास्कविना खरेदी करत आहेत. दुकानावर होत असलेल्या ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी व्यापारी कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. दुकानावर आलेले ग्राहकही आपला जीव मुठीत घेऊन खरेदी करत आहेत. याचा परिणाम दुकानांच्या वरच्या मजल्यावर तसेच परिसरात राहत असलेल्या रहिवाशांना होत आहे. दैनंदिन अत्यावशक कामकाजासाठी हे रहिवासी घराबाहेर पडतात तेंव्हा यांना दुकानापुढे होत असलेल्या गर्दीचा सामना करून बाहेर पडावे लागत आहे.
कोरोनासारख्या या जागतिक महामारीचे गांभीर्य येथील व्यापार्यांना का होत नाही, मनपा आणि जिल्हा प्रशासनाचे फिरते पथक इकडे अजुनही फिरकले नाही की, त्यांचे काही साटेलोटे आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. नांदेड शहरात दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहेत. तरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी या भागात नियमांचे उल्लंघन करणार्यावर कडक कारवाई करावी, यामुळे येथील व्यापार्यांवर तर वचक बसेलच त्याचबरोबर इतरांनाही याची धास्ती वाटून आपल्या जबाबदारीची जाणीव होईल, असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.


Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!