१५ जुलैपासून नांदेड शहर लॉकडाऊन करा!

  • महापौरांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

….गोविंद करवा….
नांदेड, दि.८: नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या जवळपास पोहचल्याने नांदेड शहरात १५ ते २५ जुलै दरम्यान दहा दिवसांचा कडक लॉक डाऊन करून संसर्गाची साखळी तोडावी, असे मागणीवजा पत्र महापौर दीक्षा धबाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी महापौरांसह प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासोबत गुगल मिट या ऑनलाईन समाजामाध्यमाद्वारे संवाद साधून कोरोना रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू, मास्क आणि शारीरिक अंतर राखण्याबाबत नागरिकांकडून घेतली जाणारी काळजी तसेच सध्या उद्भवलेली स्थिती याची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने उपस्थित होते.
कोरोना साखळी तोडण्यासाठी चर्चेअंती सर्वांनी लॉक डाऊन करण्याच्या बाजूने आपली भूमिका बोलून दाखविली. केवळ याबाबतचे आदेश काढताना दोन दिवस आधी नागरिकांना पूर्व सूचना द्या तसेच अत्यावश्यक सेवा सर्वत्र सुरू ना ठेवता अगदी मर्यादित दुकानात सुरू ठेवावी तसेच रस्त्यावर एका ठिकाणी होणारी गर्दी टाळावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लॉक डाऊन करण्यास संमती दिली असल्याने नगरसेवकांची बैठक ही औपचारिकता असली तरी, सध्याची परिस्थिती पाहता येत्या १५ जुलैपासून जिल्ह्यात कडक लॉक डाऊन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कामे उरकून घ्या..पुढचे प्रवास टाळा..!
नागरिकांनी पुढील सात दिवसात आपली महत्वाची कामे उरकून घ्यावी. कुठे जाणे आवश्यक असेल तर आताच जाऊन यावे. कुणास परतायचे असेल तर लवकर परत जावे किंवा बाहेरील लोकांना देखील नांदेडला येताना पूर्वसूचना द्यावी. कारण सर्वसाधारण कारणासाठी ई पास सुद्धा मिळणे शक्य होणार नाही. येत्या १५ ते २५ जुलै दरम्यान कोणतेही लग्न किंवा तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन शक्यतो करू नये. बाजारातून जे साहित्य आणून घेणे पुढील महिनाभरात आवश्यक आहे, ते पुढच्या सहा दिवसात शारीरिक अंतराचे पालन करून आणून घ्यावे. उर्वरित बाहेरची कामे उरकून घ्यावी, असे सल्ले प्रशासनातील काही लोक देताना पाहायला मिळत आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!