बदल्यांचा आदेशात सरकारचा ‘यू टर्न’!

कोरोना बाजूला; बदल्यांचा हंगाम सुरु

  • एकुण पदांच्या 15 टक्क्यापर्यंत संधी
  • ‘अपवादात्मक व विशेष’ कारणही चालणार
    नांदेड, दि. 7 ः कोरोना संकट अधिक गडद होत चालले असताना मागच्या अडीच महिन्यापासून निर्बंध घातलेल्या शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांची दारे सरकारने खुली केली आहेत. 30 जुलैपर्यंत मुदत देऊन एकुण पदांच्या 15 टक्क्यांपर्यंत बदल्या करण्याची मुभा देण्यात आली असून या प्रक्रियेत अपवादात्मक आणि विशेष कारणही चालणार असल्याने जीव मुठीत घेऊन का होईना, मुंबईला जाऊन बदलीसाठी ‘मोर्चेबांधणी’ करण्याची वेळ काही इच्छुकांवर आली आहे.
    कोविड संसर्गजन्य आजाराचा सामना करताना शासनाने सर्व शासकीय विभागांमधील बदल्यांवर बंदी आणण्याचा निर्णय गेल्या 4 मे 2020 रोजी घेतला होता. चालू वर्षात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्‍यांची बदली करु नये, असे स्पष्टपणे त्यात नमुद करण्यात आले असले तरी मागच्या दाराने काही बदल्यामार्फत सुरु होत्या. नगरविकास विभागाने एकाच दिवशी तब्बल 81 मुख्याधिकार्‍यांच्या बदल्या करताना कोरोना उपाययोजनेचे कारण पुढे केले असले तरी प्रत्यक्षात अनेक बदल्या तुर्तास करण्याची गरज नव्हती, असेही पुढे आले आहे.
    नगरविकास विभागाने बदल्यांचे पाऊल उचलताच इतर विभागांनी त्याकडे बोट दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन निर्णय जारी करत येत्या 30 जुलैपर्यंत बदल्यांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे महसूलसह अर्थ, कृषि, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, गृह तसेच अन्य विभागांच्या बदल्यांच्या फायलींना गती मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बाजुला पडलेल्या फायली निकाली निघणार असल्याने आठवड्यातून एक दिवस येण्याचे बंधन असलेल्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना पुढील काही दिवस दररोज किंवा एक दिवस आड यावे लागणार आहे.
    दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात अशा बदल्या करण्यात येतात. परंतु या वर्षी या कालावधीत बंधने घातल्यामुळे 31 जुलै 2020 पर्यंत कार्यरत पदांच्या 15 टक्के मर्यादीत बदल्यांची मुभा शासनाने दिली आहे. आपल्याच निर्णयाला युटर्न घेत बदल्यांच्या उलाढालीपुढे सरकारने गुडघे टेकल्यामुळे या विषयाची सर्वत्र चर्चा केली जात आहे. कारण बदल्यांची फाईल सरकवतांना त्यात बरेच काही ‘दडलेले’ असते. फाईल जितकी ‘वजनदार’ तितक्या तीव्र गतीने कामे होत असतात. त्यामुळे पुढील महिनाभर अनेक महत्वाचे अधिकारी व नेते जोखीम पत्करुन बदल्यांसाठी मुंबईत दिसणार आहेत.
Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!