नांदेडला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार!

नांदेडला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार

 • यापूर्वी दहा इंजेक्शन वापरले
 • दोघांचा जीव वाचला
 • जिल्हाधिकार्‍यांची माहिती
  गोविंद करवा
 • नांदेड,दि. 7 ः व्हेंटीलेटरवर गेलेल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शनची जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागणी केली असून ते मुबलक प्रमाणात लवकरच उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी सांगितले. यापूर्वी जिल्ह्याला मिळालेले 10 इंजेक्शन रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आले असून त्यातून दोन रुग्णांचा जीवही वाचल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
  कोरोना संसर्गावर अद्याप प्रभावी लस जगातील कोणत्याही देशाकडे उपलब्ध नाही. परंतु रेमडेसिवीर लसीमुळे गंभीर अवस्थेत गेलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आढळून आल्यानंतर गेल्या एक जून पासून केंद्र सरकारने ही लस वापरण्यास परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक ठरलेल्या या अमेरिकन लसीचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अनेक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये या लसीचा वापर केला जात असला तरी नांदेडला मात्र हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने उपचारावर अधिक खर्च करण्याची तयारी असलेले रुग्ण औरंगाबाद व अन्य ठिकाणी जाऊन गरजेनुसार लस उपलब्ध करुन घेत असल्याचे पहावयास मिळते.
  या बाबत प्रजावाणीने जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून विचारणा केली असता ते म्हणाले की, आपल्याकडे दहा इंजेक्शन शासनाने पाठविले होते. त्याचा वापरही आपण केला. आठ लसी वापरुनही रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु व्हेंटीलेटरवर गेलेल्या दोन बाधित रुग्णांना वाचविण्यात यश आले. नांदेड जिल्ह्यासाठी आणखी इंजेक्शनची मागणी केली असून लवकरच ते उपलब्ध होईल. परंतु या लसीवाचून कोणाचाही उपचार थांबणार नाही, याची पूर्णतः काळजी घेण्यात येत आहे.
  नांदेडमध्ये उपचाराच्या पुरेशा सुविधा नसल्याने बाधित रुग्ण इतर शहरांमध्ये जात असल्याच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शासकीय रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहे. नांदेडमधील काही खाजगी रुग्णालयातही सुविधा उपलब्ध असून त्यांना लागणारी मदत जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. या शिवाय इतर मोठ्या शहरांप्रमाणे नांदेडमधील काही रुग्णालयांनी स्वतःची कोवीड रुग्ण व्यवस्था स्वतंत्र करण्याचा विचार केला, तर त्याचे स्वागतच केले जाईल, असेही डॉ. विपीन यांनी सांगितले.
  कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालय तसेच कोवीड सेंटरमधून त्यांच्या कुटुंबाशी मोबाईलवर संपर्क करण्याची पूर्णतः मोकळीक आहे. तथापि, कृत्रिम श्वासोश्वास तसेच व्हेंटीलेटरवर गेलेल्या रुग्णांच्या आरोग्य प्रगतीची माहिती त्यांच्या कुटुंबिय किंवा नातेवाईकास दिवसातून दोन वेळा देण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या जातील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!