दोघांचा मृत्यू; 26 नवे पॉझिटीव्ह

 • जिल्ह्यातील बळींची संख्या 22
 • बाधितांची संख्या 484, अ‍ॅक्टीव्ह 127
  नांदेड, दि. 7 ः मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या पॉझीटीव्ह अहवालाचा पाऊस सुरुच आहे. मंगळवारच्या अहवालातील बाधितांच्या संख्येने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढून एकाच वेळी 26 जण कोरोनाबाधित निघाल्याचे कळविले आहे. यात मुखेडच्या पोलीस अधिकार्‍यासह नांदेडमधील तरोडा भागातील बालाजीनगरात 7, नविन हस्सापुरमध्ये 4, उमर कॉलनीत 3, मुखेडमध्ये 3 तसेच कंधारमध्ये दोघांचा समावेश आहे. इतवार्‍याच्या धनगर टेकडी भागातील 83 वर्षीय वृद्ध तसेच नांदेड तालुक्यातील बळीरामपुरच्या 60 वर्षीय पुरुष अशा दोन बाधितांचा केवळ 14 तासाच्या फरकाने मृत्यू झाला.
  जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 22 झाली असून पॉझीटीव्ह रुग्णांची एकुण संख्या 484 वर गेली आहे. यातील 335 रुग्णांना बरे करुन घरी पाठविण्यात आले असून उर्वरित 127 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या 26 अहवाल पॉझीटीव्ह, 67 निगेटीव्ह तर 9 अनिर्णित होते. 337 स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल उद्या सायंकाळपर्यंत येणार आहेत. तसेच मंगळवारी दिवसभरात 204 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
  इतवाराच्या धनगर टेकडी भागातील 83 वर्षीय वृद्ध तसेच बळीरामपुर ता. नांदेड येथील 60 वर्षीय वृद्ध गंभीर अवस्थेत मेडिकल कॉलेज रुग्णालयात 5 जुलै रोजी दाखल झाले होते. 6 जुलै रोजी त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आणि 7 जुलै रोजी 83 वर्षीय वृद्धाचा पहाटे अडीच वाजता आणि दुपारी 2 वाजता 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 14 तासात दोन रुग्ण दगावल्याची ही पहिलीच घटना आहे. सोमवारी 12 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी कळविले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित 10 आणि नवे 8 असे 18 रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने जिल्ह्याची काळजी वाढली आहे.
  बाधितांमध्ये 6 बालकांचा समावेश
  मंगळवारी सायंकाळी प्राप्त अहवालातील 26 बाधित रुग्णांमध्ये 6 बालकांचा समावेश आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे ः तरोडा (बु.) च्या बालाजीनगरात 5 पुरुष (वय 5, 25, 30, 58 व 5), दोन महिला (वय 34 व 55), नविन हस्सापुर येथील दोन पुरुष (वय 47 व 6) तसेच दोन महिला (वय 2 व 50), उमर कॉलनीतील तीन पुरुष (वय 4, 34, 61), पिरबुर्‍हाननगरमध्ये 18 वर्षीय तरुणी, देगलूर नाका येथील 42 वर्षीय महिला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उत्तम निवास येथील 36 वर्षीय महिला. मुखेडच्या दत्तात्रयनगरातील दोन महिला (वय 35 व 68) व एक पुरुष (वय 52), कंधारच्या विकासनगरमधील दोन पुरुष (वय 72 व 39), दापका ता. मुखेड येथील 10 वर्षीय मुलगा, पोलीस कॉलनीतील 30 वर्षीय पुरुष, मोहिजा, परंडा ता. कंधार येथील 23 वर्षीय तरुणी तसेच पळसा ता. हदगाव येथील 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!