नांदेडला लॉकडाऊनसाठी १२ जुलैची डेडलाईन !

परिस्थिती सुधारली नाही तर १५ जुलैपासून संचारबंदी

 • आजपासून संचारबंदीची ट्रायल सुरु
 • कसून वाहन तपासणी करणार
 • विनाकारण फिरणार्‍यांना घरी पाठवणार
 • नांदेड, दि. 7 ः गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नांदेड जिल्हा लॉकडाऊनच्या चर्चा मंगळवारी निश्चित आकाराला आली. ‘मिशन द ब्रेक चैन’ या मोहिमेअंतर्गत वाहने, दुकाने आणि बाजारपेठेतील घालून दिलेल्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पुढील पाच दिवस काटेकोर तपासणी केली जाणार आहे. लोकांनी नियम पाळले नाही आणि रुग्णांची संख्या वाढत राहिली तर दोन दिवसांचा अवधी दिला जाईल आणि त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे 15 जुलैपासून टप्याटप्याने संचारबंदीचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ‘प्रजावाणी’शी बोलतांना स्पष्ट केले.
  सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी काही लोकप्रतिनिधींशी मोबाईल, ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फ्रन्सींगच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊन करावे किंवा नाही तसे केल्यास त्याचे स्वरुप कसे असावे, याबाबत अनेकांच्या भूमिका समजून घेतल्या. महापालिकेच्या इमारतीत जिल्हाधिकारी डॉ. इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर तसेच मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांशी गुगलमीट अ‍ॅपलिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन संपर्क करुन त्यांची मते जाणून घेतली.
  जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्यावतीने अध्यक्ष तसेच महापौरांकडून जिल्हा आणि शहर लॉकडाऊन करण्यास संमती दर्शविणारे पत्र जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले जाणार आहे. तालुक्याच्या पंचायत समिती आणि नगरपालिकांनीही याबाबत त्यांची मते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवावी, असे प्रशासकीय स्तरावरुन सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील आमदारांशी या विषयावर पालकमंत्र्यांमार्फत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
  जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांची मंगळवारी दुपारी 4 ते 6 या दरम्यान आयुक्तांच्या कक्षात संयुक्त चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. पुढील पाच दिवस करावयाची कार्यवाही आणि त्यानंतरच्या प्रत्येक टप्यावर केली जाणारी प्रक्रिया, याचे नियोजन झाल्याचे सांगण्यात येते. लॉकडाऊन करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. परंतु नागरिकांना दिलेल्या सवलतीचा नियमांनुसार वापर होत नसेल आणि रुग्णांची संख्या वाढत गेल्यास नाईलाजाने संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ येईल. तथापि असा निर्णय अचानक न घेता लोकांना 24 ते 48 तासांचा वेळ अगोदर दिला जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
  अशी होणार कारवाई
  लॉकडाऊन शिथील केल्यानंतर वाहन तसेच सार्वजनिक ठिकाणी शारिरीक अंतर निकषाचे पालन करुन मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी जे आदेश काढले होते, त्याची अंमलबजावणी योग्यरितीने केली जात नव्हती. रात्रीची संचारबंदी कागदावर होती. परंतु पुढील पाच दिवस मात्र असे होणार नाही. दुचाकीवर चालकाखेरीज दुसरा व्यक्ती आढळल्यास 500 रुपयांचा दंड, ऑटो किंवा चारचाकी प्रवाशी वाहनात चालक इतर दोन अशा तीन पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहर्‍यावर मास्क नसणे किंवा शारिरीक अंतराचे पालन केले नाही तर 1 हजारपर्यंत दंड तसेच परवानगी दिलेल्या दुकानांमध्ये 5 हजार रुपयापर्यंत दंड आकारुन दुकान पुढील पाच दिवसात सील केले जाईल.
 • फळ व भाजीपाल्यासाठी फक्त फिरती विक्री
  फळे आणि भाजीपाल्यांसाठी फक्त फिरत्या विक्रीची परवानगी दिली असून त्या विक्रेत्यांना एकाच ठिकाणी थांबून विक्री करता येणार नाही. थांबलेले आढळल्यास 1 हजार रुपये दंड व जप्तीची कारवाई केली जाईल. बाहेरुन येणार्‍या प्रवाशांना वैद्यकीय तपासणी होईपर्यंत संस्थात्मक क्वारंटाईन केले जाणार असून तपासणीनंतर त्यांचे होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला जाईल.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!