यवतमाळात कोरोनाचा भयंकर कहर; 24 तासात 27 पॉझिटिव्ह!

जिल्ह्याची रुग्णसंख्या पोहोचली 51 वर

यवतमाळ, दि. २६: नांदेडच्या शेजारी असलेल्या यवतमाळ परिसरात गेल्या 24 तासात 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 51 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता यवतमाळमधील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. यवतमाळमध्ये सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 51 झाला आहे. त्यापैकी दहा जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 इतकी आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत. यातच यवतमाळ येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
यवतमाळमध्ये शनिवारी 20 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. शनिवारी दुपारपर्यंत 16, तर संध्याकाळी आणखी 4 रुग्ण सापडले. या 20 रुग्णांपैकी 19 रुग्ण आधीपासून विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली होते. कालच्या दिवसात सापडलेले 20 रुग्ण पवारपुरा, इंदिरानगर भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. आज रविवारी दिवसभरात 7 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून गेल्या 24 तासात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 वर पोहचली आहे. यात 14 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.


कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 26 हजार 496 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 824 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 804 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 हजार 628 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांपैंकी 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर जागतिक आरोग्य संघटने सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!