मुक्रमाबाद: पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भरला आठवडी बाजार…!


ना सुरक्षित अंतर ना तोंडावर मास्क…


मुक्रमाबाद दि. ११ एप्रिल , वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आवश्यक त्या उपाय योजना राबवित असून कोरोना या आजारातून नागरिकांना मुक्ती मिळावी जिवीतहानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून देशासह राज्यात संचार बंदी लागु करण्यात आली आहे परंतु मुक्रमाबाद शहर याला अपवाद ठरला असून लॉक डाऊन आदेशाची पायमल्ली करत पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मुक्रमाबाद येथील शुक्रवारचा आठवडी बाजार भरविण्यात आला.
देशावर उद्भवलेल्या या संकटाचा नागरिकांना आता कुठलाच गांभीर्य राहीलेले नसुन जो, तो, अतिशय बेजवाबदारपणे वागत काहीच कामे नसतानाही घरा बाहेर पडू लागले आहेत. तर यांना शिस्त व कोरोना वायरसचे गांभीर्य सांगण्यातच पोलिस प्रशासनाची माञ चांगलीच दमछाक होत आहे. तर नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे शहरासह परीसरात संचार बंदीच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. मुक्रमाबाद येथील दोन दिवशीय शुक्रवारचा मोठा आठवडी बाजार भरत असतो. या बाजारला मराठवाड्यासह तेंलगाना ,कर्नाटक राज्यातील व आंध्रा प्रदेशातून हजारो नागरिक येत असतात. कोरोना या आजाराचा विळाखा वाढत असल्यामुळे सुरक्षितेच्या कारणामुळे येथील आठवडी बाजार हा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले होते. पण या आदेशालाच मुक्रमाबाद येथील व्यापाऱ्यांनी हारताळ फासत आपली दुकाने चालू ठेऊन दैनंदिन व्यवहार चालू ठेवला तर यात भर म्हणून आठवडी बाजारही मोठा भरविण्यात आला. यावेळी कुठलेच सुरक्षित अंतर ठेवण्यात आलेले नव्हते की, कोणताही व्यापारी व नागरिक हे, तोंडाला मास्क घातलेला घालून बाजारात आला नसल्यामुळे कोरोनाला अधिक बळ मिळत आहे. तर परवानगी नसतानाही आजचा आठवडी बाजार मोठा भरल्यामुळे शहरात पोलिस प्रशासन आहे.का.नाही..? असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडलेला आहे. तर भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे ठिकठिकाणी जत्थे पहावयास मिळत आहे.या सह शहरातील बँकेसमोर लागलेल्या रांगेत ही सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडतांना दिसत आहे.शहरासह ग्रामीण भागात ही अशीच परिस्थिती पहावयास मिळत असल्याने पोलिसांची अपुरी संख्या व परिसर व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांवर मोठा तान येत आहे.
आजही ग्रामीण भागातील लोक रस्त्यावर, चौकात,समाज मंदिरात समूहाने वावरतांना दिसत आहेत. तर आता पोलिस प्रशासन हे, विनाकारण बाहेर फिरणा-यां झुंबड बाजांना समज देण्याऐवजी त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलून कारवाई करण्याची आता खरी वेळ आलेली आहे. असे केले तरच लॉक डाऊनचा खरा हेतू साद्य होईल अन्यथा लॉक डाऊन हा नावालाच राहणार आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासन हे.अटोकाट प्रयत्न करीत आहे. या आजारावर मात करण्यासाठी शासन हे, अनेक सुचना देत आहे. पण दिलेल्या या सुचनाचे पालण करतांना कोणताच नागरिक दिसत नाही.शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना ही कोरोना चे गांभीर्य नसल्यानेच हे सर्व प्रकार घडत आहे.तर कोरोनाचे रूग्न हे, शेजारी असलेल्या लातूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील बिदर व तेंलगाना राज्यात आढळले असल्यामुळे आता तरी नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्ष्यात घ्यावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे न केल्यास कोरोना ग्रामीण भागात ही आपले पाय पसरवू शकते व तसे झाल्यास ते आटोक्यात आणणे हे प्रशासनासमोरचे एक मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी कोरोनाचा धोका ओळखून प्रशासनाला सहकार्य करुन घरातच बसुन रहावे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत जीवनाअश्यक दुकाने सोडून आठवडी बाजार व इतर दुकाने चालू करू नये , अशी भावना या महामारी च्या काळात खबरदारी ने वागत असलेल्या सुज्ञ व्यक्त होत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!