बाहेरून आलेल्यांना ‘त्या’ प्रवाशांना ‘सरकारी पाहुणाचार’

५ एप्रिलनंतर आलेल्यांची शोधमोहीम सुरू

‘होम’ क्वारंटाईनऐवजी संस्थात्मक क्वारंटाईन   

हदगाव – हिमायतनगरात प्रत्येकी 17 पथके तैनात 

हदगाव (वार्ताहर) दि. 10 ः  हदगाव – हिमायतनगर तालुक्यात गावात किंवा शहरात कुठेही पाच एप्रिलनंतर बाहेरून आलेल्या लोक असतील तर त्यांची शोध मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. हे लोक तसेच त्यापूर्वी आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे लक्षण आढळून आल्यास प्रशासनाने निश्चित केलेल्या अलगीकरण कक्षात ठेवले जाणार असल्याचे हदगावचे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले. 
संपूर्ण जग कोरोनाच्या वेढ्यात अडकले असतांना देश आणि राज्यासह नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव शक्य असल्याानेे दक्षता बाळगणे महत्त्वाचे आहे.

५ एप्रिलनंतर गावाकडे परतलेल्या लोकांची यादी जमवून त्यांची तपासणी मोहीम हाती घेण्याची सूचना हदगाव येथील उप विभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी केली आहे. सध्या जे लोक पूर्वी आले त्यांना देखील कोरोनासारख्या आजाराशी सदृष्य तक्रारी आहेत का, याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हदगाव नगरपालिका, हिमायतनगर नगरपंचायत व प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी हे आदेश  दिले आहेत. हदगांव शहरात सतरा वॉर्ड असून सतरा पथक नेमले आहेत. या पथकात एक डॉक्टर, एक नगरपालिका कर्मचारी, एक शिक्षक यांची नियुक्ती केली आहे. या पथकाने प्रत्येक घरी जाऊन यापूर्वी पुणे मुंबई किंवा इतर महानगरातून आलेल्या लोकांची तपासणी करणे सुरु केले आहे. अशा लोकांमध्ये कोरोनाचे काही लक्षण आढळून आले असतील तर अशा लोकांना होमक्वारंटाईन ऐवजी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. म्हणजे या लोकांना गावाशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्कात येणार नाहीत, अशा पद्धतीने राहण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर केली जाणार आहे.  त्यासाठी गावातील शाळा, कॉलेज, समाजमंदिर किंवा अंगणवाडी इमारत अधिग्रहित करावी असे निर्देश उपविभागीय अधिकारी वडदकर यांनी दिले आहेत. शिवाय मागील चार दिवसात म्हणजे दिनांक 05 एप्रिल पासून नंतर आलेल्या लोकांना सक्तीने कुटुंबापासून अलगीकरण करण्यात येणार आहे.   या लोकांच्या राहण्याची, जेवणाची व इतर सर्व व्यवस्था समाज कल्याण विभागाच्या सामाजिक न्याय भवन या वस्तीगृहात इमारत क्रमांक एक व इमारत क्रमांक दोन मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामस्तरावर देखील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील व आशा वर्कर यांनी असे प्रवासी नागरिक शोधून काढून त्यांची शासनाच्या खर्चाने व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!