कंधार : कोरोनाच्या संशयाने सर्वत्र खळबळ; अज्ञात महिलेस उपचारास नेण्यास ग्रामीण रुग्णालयाचा नकार


पालकमंत्र्याच्या सुचने नंतर आली रुग्णवाहिका


योगेन्द्रसिह ठाकूर


कंधार, दि.८ बहाद्दरपुरा येथील मान्याड नदीच्या पुला जवळ एक अज्ञात महिला अस्वस्थ अवस्थेत पडलेली होती. तीस कोरोना असावा या संशयाने सर्वत्र खळबळ उडाली. कंधारच्या व पानशेवडीच्या दोन्ही शासकीय रुग्णालयाने या महिलेस नेण्यास असमर्थता दर्शवली. प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांनी तहसीलदारां सह संबंधितांना संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले त्या नंतरही प्रशासनाने कुठलीच भुमिका घेतली नसल्याने प्रा.धोंडगे यांनी पालकमंत्री यांना संपर्क केला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या त्यानंतर त्या अज्ञात महिलेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास रुग्णवाहिका आली.
जगभरात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. भारतात पाय पसरवीत असलेल्या या रोगास रोखण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आले आहे. याचा संसर्ग झालेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाशी सैनिका सारखे लढा देत आहेत. सर्वत्र असे चित्र असले तरी कंधार मध्ये मात्र कालच्या घटनेवरून वेगळेच चित्र दिसून आले. कोरोनाशी लढा देण्यास आम्ही तयारी आहोतं म्हणणारी येथील प्रशासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून आले.
बाहेर गावावरून पाई चालत आलेली एक अज्ञात महिला बहाद्दरपुरा येथील मन्याड नदी वरील पुला पासुन जवळच अस्वस्थ अवस्थेत पडलेली दिसून आली. अज्ञात महिला आपल्या पुला जवळ पडून असल्याची माहिती तीला पाहिलेल्या एक व्यक्तीने सरपंच माधव पेठकर यांना दिली. अज्ञात महिलेच्या अंगात ताप व खोकला असल्याने तीस कोरोना तर नसावा या संशयाने सर्वत्र खळबळ उडाली होती.
सरपंच पेठकर यांनी माजी जि. प.सदस्य प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांना सर्वमाहिती दिली. प्रा.धोंडगे यांनी मोबाईल वरून तात्काळ कंधारच्या ग्रामीण रुग्णालयास संपर्क केला. असता तेथील डॉक्टरांनी रुग्णाला न पाहताच जागेवर बसूनच आमच्या कडे कोरोना ची सेफ्टी किट उपलब्ध नसल्याचे सांगत येण्यास नकार दिला. एव्हढेच नाहीतर बहाद्दरपुरा गाव पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत आहे. त्यांच्याशी संपर्क करण्याचा सल्लाही कंधारच्या ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आला.
पानशेकडी व कंधारच्या डॉक्टरांनी हात झटकल्या नंतर प्रा. धोंडगे यांनी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्याशी बोलले त्यांना परिस्थितीचे गभीर्य सांगितले तरीही काहीही उपयोग झाला नाही.हा सर्व खटाटोप करण्यात जवळपास तीन ते चार तास लोटल्या नंतर प्रा.धोंडगे यांनी अखेर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क केला. पालकमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना सुचना केल्या. यानंतर जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ.निलकंठ भोसीकर यांनी रुग्णवाहिका पाठविली. त्या अज्ञात महिलेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. कोरोना शी लढा देण्यास आम्हीं तयार आहोत असे म्हणाऱ्या कंधारच्या प्रशासनाचा या घटनेवरून बेफिकीर व अक्षम्य कारभार दिसून आला.

हद्दी वरून हद्दपार !
अनेक वेळा कोणती घटना घडल्या नंतर गुन्हा दाखल करण्यावरून पोलीस ठाण्यांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित केल्याचे ऐकले आहे. परंतु आरोग्य सुविधा देण्या वरून आरोग्य विभागाने हद्दपार केल्याच्या पाहायला मिळाले. सध्या सर्व देश एक जुटीने कोरोनाशी लढा देत आहे. असे असताना बहाद्दरपुरा येथील आलेल्या अज्ञात महिलेला उपचार देण्यास नकार देत कंधारच्या ग्रामीण रुग्णालय व पानशेवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने हद्दीचा मुद्दा उपस्थित करून अक्षम्य कारभार केल्याचे बोलल्या जात आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!