इंडोनेशियातील १० व दिल्लीच्या दोघांविरोधात नांदेडला गुन्हे दाखल

स्वतःची माहिती लपवली; विदेशी व्यक्ती कायद्याचे उल्लंघन

नांदेड, दि.8: कोव्हिड- १९ ची देशभर अंमलबजावणी सुरू असताना प्रवासाची माहिती लपविणे, जमावबंदी आदेश तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून इंडोनेशियातील दहा जणांसह दिल्लीतील दोन, अशा बारा जणांविरुद्ध नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीसाठी या सर्वांना ताब्यात घेतले असून तपासणीअंती त्यांच्या घशाच्या द्रवाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळू गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिल रोजी त्यांना पोलीस नाईक शिवसांभ मारवाडे, निहरकर आणि शेख इमारान यांनी ही माहिती दिली, की इंडोनेशीयाचे दहा नागरिक ज्यात 5 पुरुष आणि 5 महिला तसेच दिल्ली येथील पती पत्नी असे 12 जण 15 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास राहिले. त्या सर्वांची पोलिसांनी स्वब तपासणी केली. त्यात सध्या ते डॉक्टरांच्या  निगराणीखाली आहेत.
या सर्वांचे पासपोर्ट, व्हिसा 2020 ते 2024 पर्यंत प्रत्येकाचे वेगवेगळ्या वर्षात वैध आहेत. सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मार्च ते 8 मार्च ते मरकज मध्ये राहिले. 9 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील कुवा मस्जिदमध्ये राहिले.
दि. 10 मार्च रोजी अजून एकाच्या घरी थांबवले आणि 11 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील दुसऱ्या जागी राहिले. 13 मार्च पर्यंत ते असेच वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून ही सर्व मंडळी रेल्वेने नांदेडकडे निघाली. ते सर्वजण 15 मार्च रोजी सकाळी 7 वाजता नांदेडला पोहचले. नांदेडमध्ये 15 ते 19 मार्च हिलालनगर येथे थांबले. 19 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान हे सर्व विदेशी नागरीक अन्य व्यक्तीच्या घरी थांबले. 3 ते 4 एप्रिल दरम्यान रहेमतनगर येथे थांबले. नांदेडला माजी नगरसेवक यांच्यासह विविध प्रतिष्ठित व्यक्तींकडे हे लोक थांबलेले होते.
या सर्व लोकांच्या मोबाईलचे गुगल लोकेशन,  सी.डी.आर आणि एस.डी.आर. तपासले असता त्यांनी जमावबंदी व संचारबंदीचे आदेश असतांना एका ठिकाणी न थांबता 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमून वेगवेगळ्या ठिकाणी संचार करत होते. विदेशी व्यक्ती अधिनियमाच्या कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन केल्याची माहिती उघडकीस आली.
या प्रकरणात बाळू गीते यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 124/2020, कलम 188, 269, 270 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 च्या कलम 14 सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे. या सर्व लोकांच्या स्वब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पोलिसांना खबर, जिल्हाधिकारी बेखबर!

इंडोनेशिया येथून आलेल्या विदेशी नागरिकांबाबत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे माहिती होती. दिल्लीतून मरकज येथील कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लोकांची पहिली व दुसरी यादी आली, तेव्हा मगर यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना या विदेशी धर्मगुरूबद्दल माहिती दिली होती. इतकेच नव्हे तर हे सर्व जण एका मशिदीत थांबले असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर दाखल झाले. तेव्हा त्यांनी ही माहिती खरी असल्याचे पत्रकार परिषदेतच जाहीर केले. यावरून विदेशी धर्मगुरू यांच्या संचार आणि स्थानिक वास्तव्याची माहिती जिल्हा प्रशासनास दिली गेली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!