बाऱ्हाळी: चालू शैक्षणिक सत्राच्या परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस घेऊन सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करा – एसएफआय


बाऱ्हाळी दि. ८ एप्रिल वार्ताहर – कोरोनाच्या (कोव्हीड-१९ ) लॉकडाऊनमुळे राज्यातील पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांच्याकडे ई-मेलद्वारे करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरासह देशात आणि राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आपल्या राज्यात आढळले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करतच आहेत. परंतु या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आवाहन प्रशासनासह आपल्या सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत अनेक कामगारांचे काम हातातून निसटले आहेत. अनेकांना कामे सोडून गावी परतावे लागले असून उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक कुटुंबे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करीत आहेत. याचा परिणाम विद्यार्थी वर्गावर देखील तितकाच झालेला आहे. म्हणून एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने राज्य शिक्षण विभागाकडे काही सूचना व मागण्या केलेल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी देखील अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व प्राध्यापक, विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नियोजन करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. तसेच राज्यातील बऱ्याच विद्यापीठातील अनेक विभागाचे अभ्यासक्रम शिकवण्याचे अजून राहिलेले आहे. अनेक विद्यार्थी आपले अभ्यासाचे साहित्य शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी ठेऊन गावी आलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हटवल्यानंतर लगेच परीक्षा घेऊ नयेत. त्यामुळे लगेच परीक्षा न घेता विनाअट सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात यावा. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर किमान एका महिन्याने या शैक्षणिक सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. अंतिम वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आगामी शैक्षणिक वर्षात झाल्यानंतर लगेच त्यांचे निकाल देऊन त्यांना पुढील शिक्षणास प्रवेश देण्यात यावे. अशी मागणी एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी चे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड , राज्यसचिव रोहिदास जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!