हिंगोली दि. ३ एप्रिल , प्रतिनिधी – हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दि.०३ एप्रिल रोजी माहूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दरम्यान खा.पाटील यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयातील अस्वछतेबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन चांगलेच खडसावले .यावेळी त्यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयास भेट देऊन कोरोना लॉकडाऊन स्थितीतील आपत्ती व्यवस्थापणाचे नियोजन जाणून घेतले व विविध उपाय योजना करण्याबाबत सूचना केल्या. देशात सगळीकडे कोरोना विषाणूमुळे हाहाकार उडाला असून माहूर तालुक्यातील आरोग्य विभाग मात्र गंभीर असल्याचे दिसत नाही सगळीकडे अस्वछता, औषधांचा तुटवडा यावरून माहूर तालुक्यातील आरोग्य विभाग सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा रोष खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.याबाबत त्यानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.एन.भोसले यांच्याशी चर्चा करून लॉकडाऊन दरम्यानच्या आरोग्य व्यवस्था व कोरोना विषाणूच्या उपाययोजनेबाबत जागरूक राहून तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लावण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना नागरिकांना शासनातर्फे मोफत देण्यात येणारे धान्य हे एप्रिल, मे व जून महिन्याचे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत वाटप करण्याच्या सूचना करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचने नुसार कोणताही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. तसेच तालुक्यातील प्रत्येक स्वस्तधान्य दुकानदरांची नाव आणि संपर्क क्रमांकासह अपडेट यादी घेऊन रेशन बाबत कोणत्याही गावात काही समस्या उदभवू नये व शासनाचे निर्देशाची गावस्तरावरील लोकप्रतिनिधीना माहिती व्हावी यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिक व लोकप्रतिनिधीपर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास स्वतः संबधित राशन दुकानदारास संपर्क करीन असा सज्जड इशारा दिला. तर गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान यांच्याकडून तालुक्यातील ग्रामीण भागातील उपाययोजना जाणून घेत त्यांनी राबवीत असलेल्या उपाययोजनेची दखल घेऊन व सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहचल्या पाहिजेत याबाबत सूचना केल्या. . माहूर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याकडून माहूर शहरातील उपाययोजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली व कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये शहरातील सर्व भागात औषध फवारणी करून स्वछता ठेवावी .याबाबत सूचना करून तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसायाबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. अत्यावश्यक सेवेसाठी जात असलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये व कामा व्यतिरिक्त विनाकारण लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्याना सुद्धा आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा बडगा उचलण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास केल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव,शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, शिवसेना शहरप्रमुख निरधारी जाधव, सोमेश पतंगे, सुनील गरड, माहूरच्या नगराध्यक्षा कु.शीतल जाधव, कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, नगरसेवक इलियास बावाणी, नंदू संतान, सुमित राठोड, , पत्रकार जयकुमार अडकीने, गजानन भारती, बालाजी कोंडे यांची उपस्थिती होती.