मुखेड : टरबुजाच्या उत्पन्नावर कोरोनाचे गंडांतर… बाजारपेठ बंदी मुळे दारोदारी टरबूज विकण्याची वेळ


शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान


मुखेड दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टरबुजाला मागणी असूनही बाजारपेठा बंद असल्याने दारोदारी येऊन कमी दराने टरबूज विक्री करत असल्याने उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाल्याची माहिती पाळा येथील टरबूज उत्पादक विलास प्रकाश उमाटे व माधव खुशालराव उमाटे यांनी दिली.
पाळा येथील सदन शेतकरी विलास प्रकाश उमाटे, माधव खुशाल उमाटे, सतीश त्र्यंबक मुंजेवार, गंगाधर प्रकाश उमाटे हे नियमित टरबुजाचे उत्पन्न घेतात. यंदा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आवक-जावक करण्यासाठी गाड्या बंद असल्याने व्यापारी कोणी येत नाहीत. सव्वा एकरमध्ये सव्वा ते दीड लाख रुपयाचे टरबुज व्हायला पाहिजे परंतु टरबुजाची मागणी असूनही बाहेरगावी जाण्यासाठी मार्केट उपलब्ध नसल्यामुळे याचा फटका उत्पादक शेतकऱ्यावर बसला आहे. पाळा येथून मुखेड मध्ये गल्लोगल्ली फिरून पन्नास रुपयाचे टरबूज दहा ते पंधरा रुपयाला विकावे लागत असल्यामुळे आमच्या ट्रॅक्टरच्या डिझेलचाही खर्च निघत नाही. बियाणे व इतर खर्च तरी वेगळा राहिला अशी खंत विलास प्रकाश उमाटे, माधव खुशाल उमाटे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केली. घातलेले बी-बियाणे व खर्च तरी निघण्या पुरते अनुदान शासनाने आम्हाला मंजूर करावे अशी विनंती तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे उमाटे बंधुंनी केली आहे. या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा प्रयोगशील शेतकरी सुरेश पाटील पाळेकर यांच्यासह पाळा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!