मुखेड : लॉकडाऊनमुळे तेलंगणा राज्यात अडकले मुखेड तालुक्यातील दोन हजार मजुर

मिरची तोडण्याच्या कामासाठी केले होते स्थलांतर

आशिष कुलकर्णी


मुखेड दि.3 एप्रिल , – मुखेड तालुक्यात काम नसल्याने तालुक्यातील दोन हजार मजुर मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणुन कामासाठी गेले होते. पण दि. 24 पासुन कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन केल्याने तेलंगणा राज्यात दोन हजार मजुर अडकले आहेत. यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत.
तेलंगणा राज्यातील खमंग व कोठागूडूम जिल्हयात मिरची व्यवसाय खुप प्रसिध्द आहे. मुखेड तालुका डोंगराळ भाग असुन वाडी तांडयाची येथे संख्या जास्त आहे. येथील बंजारा बांधव शेतीची कामे उरकुन मिरची कामासाठी तेलंगनात मागील महिण्यात कामाला गेले पण लॉकडाऊनमुळे हाताचे कामही गेले रोजगारही अशी अवस्था त्यांची झाली.या मिरची कामगानांना प्रतिकिलो 7 ते 8 रुपये पर्यंत मावेजा मिळतो. एक कामगार रोज 500 ते 600 रुपये पर्यंत काम करतो तर साधारण तीन महिण्यासाठी हे काम असते.
तालुक्यातील रत्ना तांडा, जिरगा तांडा,प्रकाश नगर, बा-­हाळी,होनवडज, होनवडज तांडा,मन्नु तांडा, तारदरतांडा,देवला तांडा या गावातील हे मजुर असुन त्यांना आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे.या कामगारांना जिवनाश्यक वस्तु,अन्न धान्य यांची सोय करावी करावी व त्यांना घरी आणण्यासाठी खमंग व कोठागूडूम जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधावा अशी मागणी आ.डॉ. तुषार राठोड यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तेलंगणा राज्यात अडकलेले मजुरदार बाबु चव्हाण यांनी सांगितले की, आमची टोळी मालकाच्या शिवारात असुन ग्राम पंचायतचे अधिकारी येऊन आमच नोंद करुन घेतल आहे. गावाकडे आमचा पुर्ण परिवार असुन त्यांच्याजवळ सुध्दा खाण्यासाठी पैसा नाही. बँकेत जावं म्हटलं तर बँकेतही जाऊ देईनात. आमची काळजी ते करीत आहेत अन त्यांची काळजी आम्ही करीत आहोत. तालुक्यातील जवळपास दोन हजार मजुर तेलंगनात अडकले असुन आम्हाला आमच्या गावी आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे सांगितले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!