किनवटच्या महिला स्वयंसहायता समुहाने उचलली मास्क बनवण्याची जबाबदारी


अंगणवाडी पर्यवेक्षिका कडूनही पोलिसांना मोफत मास्क


आशिष देशपांडे


किनवट दि. १ एप्रिल – दीनदयाल अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान नगर परिषद किनवट अंतर्गत स्थापन केलेल्या महिला स्वयंसहायता समुहाने मास्क तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या मास्कला मोठी मागणी होत आहे.मागणीच्या तुलनेत मास्कचा तुटवडा आहे. सर्वांनाच सहज मास्क उपलब्ध व्हावेत,यासाठी पालिकेतंर्गत असलेल्या शहरातील विशाखा महिला बचत गट सिद्धार्थनगर, सद्गुरु समर्थ महिला स्वयंसहायता समूह सुभाषनगर या संस्थांनी मास्क तयार करण्याची जबाबदारी उचलली आहे.मास्क तयार करताना सोशियल डिस्टंसिंगची पुरेपुर काळजी घेऊन महिला सदस्यांना कापड वितरित करण्यात येत आहे.गेल्या ८ दिवसांत स्वयंसहायता समुहाने पालिका कर्मचारी नरेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनात तब्बल ४ हजार मास्क नाममात्र दरात विक्रीसाठी तयार केले आहेत.सामाजिक भान ठेवून मास्क तयार करणाऱ्या समुहांचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच सहायक प्रकल्प अधिकारी कु.विजया वाघमारे यांनी कौतुक केले.
अंगणवाडी पर्यवेक्षिकेने तयार केले १ हजार मास्क
गोकुंदा येथील रहिवाशी व तालुक्यातील उमरी बाजार येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका श्यामल पांडागळे यांनी मास्क निर्मितीसाठी पुढाकार घेत १ हजार मास्क बनवले. रणरणत्या उन्हात शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस, आरोग्य व पालिका कर्मचाऱ्यांसोबतच कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या सर्वांनाच श्यामल पांडागळे यांनी मोफत मास्क देण्याचा संकल्प केला आहे.बुधवारी दि.१ रोजी वाघमारे यांनी येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मारूती थोरात यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!