हदगाव तालुक्यातील टरबूज उत्पादक अडचणीत; विक्री अभावी शेतात सडत आहेत टरबूज


राज्याबाहेर निर्यात नसल्यामुळे भाव पडले


हदगाव दि. ३१ मार्च , तालुका प्रतिनिधी

कोरोणा विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे हदगाव तालुक्यातील टरबूज(कलिंगड) उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे .काढणीसाठी तयार असलेले टरबुज विक्री अभावी शेतातच सडत आहेत. अंतर राज्यातील सीमा बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग टरबुजाची खरेदी करण्याची हिंमत करीत नाहीत.यामुळे लाखो रुपये खर्चून काढणीस तयार केलेले पीक हातचे गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान टरबूज पिकांच्या शेताची पंचनामे कृषी विभागाने करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तालुक्यातील मौजे उंचेगाव देशमुख येथील शेतकरी सुधाकर देशमुख यांनी आपल्या शेतात सुमारे एक एकर शेतावर टरबूज (कलिंगड) या पिकाची लागवड केली आहे. ठिबक सिंचन, मील्लीचिंग पेपर असा सुमारे ६०ते ७० हजार रुपये एकूण खर्च करून टरबुजाचे पीक काढणीसाठी तयार केले आहे.परंतु कोरोणा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव फळ बाजारात सुद्धा जाणवत आहे. बाजारातील मंदीमुळे एक एकर शेतातील टरबूज विक्री अभावी जागीच सडत आहेत. निवघा विभागातीलअनेक गावांच्या सीमा गावकऱ्यांनी कोरोणा रोगाच्या धास्तीने बंद केल्या आहेत.यामुळे देशमुख यांना टरबुजाची किरकोळ विक्री करण्यास आसपासच्या गावात विरोध होत आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्राबाहेर जाणारे रस्ते राज्यसरकारने बंद केले आहेत.यामुळे व्यापाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर फळ व भाजीपाला निर्यातीस मनाईआहे. परिणामी व्यापारीवर्ग सुद्धा शेतकऱ्यांकडून मोजकीच फळ व भाज्यांची खरेदी करीत आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!