हिंगोलीत खाकीतील ‘माणूसकी’ हरवली?


अर्धापूर, दि.३० मार्च तालुका प्रतिनिधी -: देशभर सर्वत्र पोलीस आणि डॉक्टरला देवाची उपमा दिली जात आहे. राज्यभर पोलीस डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. पण हिंगोलीत मात्र ‘खाकी’ तील दहशत सध्या चांगलीच चर्चेला आली आहे. आम्ही कायद्याचे पालन करत आहोत असा अविर्भाव आणत असून सर्वसामान्य माणसाला मात्र याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. नांदेड-नागपूर महामार्गावर हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब जनतेला संचारबंदी आणि नाकाबंदीच्या नावाखाली प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कारणाने हिंगोलीतील खाकीची माणूसकी हरवली का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कोरोनाचा वाढता कहर पाहता संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. या बंदीचे सर्वांनी स्वागतच केले आहे. एकीकडे देशातील हाय प्रोफाईल लोकांना कोरोना रोगासह विमानाने देशात आणले. तर दुसरीकडे याच देशातील सर्वसामान्य गरीब नागरीक ७०० किलोमीटर पर्यंत प्रवास करूनही आपले घर गाठू शकने अवघड झाले आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता प्रत्येकजन आपल्या गावची धाव करत आहे.
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गवरही आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून आलेले हातावर पोट असणारे मजूर कोणी पायी तर कोणी मिळेल त्या वाहनाने ये-जा करत आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या आपल्या भागात जाण्यासाठी धडपड करत आहेत. वृद्ध, महिला, लहान मुलांसह कुटुंबाचा समावेश आहे. ना कुठे जेवणाची सोय…ना राहण्याची सोय अशा अनेक अडचणींचा सामना करून त्यांचा प्रवास सुरु आहे.
नांदेड-नागपूर महामार्गवर नांदेड-हिंगोलीवरील हिवरा पाटीनजीक सीमेवर येऊन वाहने थांबत आहेत. त्यांना हिंगोली जिल्ह्यातील पोलीसाकडून मात्र चांगलीच अडवणूक होत आहे. जसे की एखादा दहशतवादीच सीमा ओलांडून आपल्या देशात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहनांची व माणसांची गर्दी जमा होत आहे. त्यामुळे गोर-गरीब जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. यापूर्वीही हिंगोली पोलिसांकडून त्यांच्या खात्यातील जमादार व त्यांच्या मुलीला मारहाण केल्याचे अमानुष कृत्य घडले होते. रविवारी टीव्ही चॅनेलच्या एका पत्रकारालाही निर्दयीपणे मारहाण केली आहे. त्यानंतर आता गोर-गरीबाची अडवणूक करणे हा प्रकार समोर आल्यामुळे सर्वसामान्य जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कायद्याचा वापर हा लोकांना प्रेमाने व विश्वासात घेऊन पोलिसांनी केल्याचे राज्यात अनेक उदाहरणे असतानाही हिंगोलीत मात्र खाकीतील माणूसकी हरवल्याचे चित्र दिसत आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी….

सदरील गोरगरीब जनतेची अडवणूक होत असल्याची माहिती मिळताच अर्धापूर नगरपंचायतचे गटनेते अँड.किशोर देशमुख यांनी भेट दिली. सर्वात सुरुवातीला या लोकांना जेवणाचे साहित्याचे वाटप केले. या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनूरी आ. संतोष बांगर वसमतचे आमदार राजुभैया नवघरे व खा.राजीव सातव यांच्याशी संपर्क साधून या लोकांची अवडणूक होत असल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून दिली. तसेच प्रशासनास बोलून मार्ग काढावा अशी विनंती केली. यावेळी तातडीने या सर्वांनी याबाबत प्रशासनाशी संपर्क साधून सदरील लोकांना अडचण व त्रास होऊ नये अशा सूचना केल्या.साहित्याचे वाटप करताना अँड.किशोर देशमुख, सखाराम क्षीरसागर, विलास साबळे, अजित गटाणी आदी उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!