अर्धापूर: कोरोना’ मुळे फळ-फुल-भाजीपाल्याची शेती संकटात…..; शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका…!

अर्धापूर, दि.२९ मार्च तालुका प्रतिनिधी – : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक वस्तूना यातून वगळले असले तरी शेतकऱ्यांना दररोज उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळ-फुल-भाजीपाला या पिकांना पिकांना ग्राहकच नसल्याने लाखो रुपयांचा फटका बसत आहे. पार्डी म.(ता.अर्धापूर) येथील लक्ष्मणराव उर्फ माधवराव कवडे या शेतकऱ्यांकडे सात एकर शेती आहे. या शेतीमध्ये अडीच एकर टरबूज, दोन एकर कोबी, दहा गुंठे टमाटे, तीस गुंठे शेड-नेट मधील गुलाब व इतर बिजली, शेवंती सारखी वेगवेगळ्या जातीची फुले आहेत. ही काढणीस आलेली नकद पिके आहेत. ‘कोरोना’ मुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे दळण-वळण व बाजारपेठा ठप्प आहेत. यातून जरी फळे व भाजीपाला या पिकांना वगळले असले तरी घेणारा ग्राहक तुलनेने प्रचंड तुरळक आहे. त्यामुळे व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. सदरील पिकांच्या लागवडीसाठी या शेतकऱ्याने चार लाख रुपयांच्या वर खर्च केला. शेतकऱ्याला जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. तर फुलांच्या माध्यमातून दररोज तीन ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. यामुळे सदरील शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. कोरोना विषाणूंने जगभरात हाहाःकार माजविल्याने मोठी शहरे लॉकडाऊन केल्याने दळणवळण साधने बंद आहेत. देशात संचारबंदी लागू असल्याने खरेदी करण्यासाठी व्यापारी बाहेर पडत नाहीत. अशा अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसत आहे. सदरील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!