देगलूरात थांबलेल्या राजस्थानच्या नागरिकांनी ठोकली धूम; उत्तरप्रदेशचे 22 नागरिक ही जाण्याच्या तयारीत


मनोहर देगावकर


देगलूर दि. २९ मार्च – तेलंगणातील राज्य शासनाने परराज्यातील नागरिकांना महाराष्ट्राच्या सिमेवर सोडून देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे राजस्थानच्या तीनशे नागरिकांना शनिवारी महसूल व पोलीस प्रशासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवले होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या गावी जायचे आहे हे धोरण त्यांनी ठरविल्याने काही शनिवारी रात्रीच गेले तर काहीनी रविवारी सकाळी जसे जमेल त्या अवस्थेत देगलूर सोडले.रविवारी सकाळी तेलंगणातून आलेल्या 22 उत्तरप्रदेशच्या नागरिकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रहाण्याची सोय केली. मात्र ते ही येथे रहाण्याच्या मनस्थितीत नाहीत.
राजस्थान असेल की उत्तरप्रदेशचे जे नागरिक तेलंगणातील विविध शहरात विविध कामानिमित्त होते. ते सर्व नागरिक आपल्या गावी निघाले आहेत. त्यांना जाण्यासाठी ना बस ना रेल्वे तरीही ते निघाले आहेत. तेलंगणातील राज्य शासनाने बाहेरराज्यातील नागरिकांना महाराष्ट्राच्या सिमेवर नेवून सोडण्याचे आदेश दिल्यानेच ते ट्रक मधून तेलंगणातील मदनूर पर्यंत येत आहेत. तेथून देगलुरच्या सिमेवर येत आहेत. शनिवारी सकाळी राजस्थानचे तीनशे नागरिकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवण्यात आले होते. त्यांना शनिवारी दोनवेळेस जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली होती. मात्र शनिवारी रात्री काही जणांनी तर रविवारी सकाळी राजस्थानचे नागरिक मिळेल त्या वाहनात किंवा शेताशेताने नांदेडच्या दिशेने गेले आहेत. रविवारी सकाळी पिंपळगावचे तलाठी हे चहा घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेले असता त्यांना तुमचा चहा नको की अन्न नको आम्हाला आमच्या गावी सोडा असे राजस्थानचे नागरिक म्हणत होते. तद्नंतर थोड्याच वेळात ते मार्गस्थ झाले.
रविवारी सकाळी तेलंगणातील उत्तरप्रदेशचे 22 नागरिक शहरात येत असताना त्यांना अडवून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवण्यात आले. मात्र त्यांना ना पिण्यास पाणी नव्हते ना खाण्यासाठी काही उपलब्ध करून देण्यात आले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक संगमनाथ पेरगेवार, पोलीस उपनिरीक्षक जाकीकोरे हे रविवारी दुपारी दिड च्या सुमारास त्यांना खाण्यासाठी टरबूज घेऊन गेले होते. मात्र त्या नागरिकांनी आमची व्यवस्था होत नसेल तर आम्हाला कशाला येथे ठेवता, आम्हाला जावू द्या असे म्हणत होते. उत्तरप्रदेश चे नागरिक ही चालत जाण्याच्या तयारीत होते.

तेलंगणातील 50 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाठविले
तेलंगणातील विविध जिल्ह्य़ातील 50 विद्यार्थी उदगीर येथे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. शनिवारी ते पायी चालतच देगलूरला आले होते. त्यांची व्यवस्था मानव्य विकास विद्यालयात करण्यात आली होती. नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी या विधार्थाची भेट घेऊन त्यांच्या दोनवेळेसच्या जेवणाची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे तेलंगणाच्या सिमेवर असणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी बोलून त्याविद्यार्थीना वाहनाव्दारे रविवारी दुपारी पाठवून देण्यात आले. मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांनीही याकामी लक्ष घातले.

परराज्यातील नागरिकांच्या जाण्याची व्यवस्था शासनाने करावी.
ज्या राज्यात परराज्यातील नागरिक आहेत त्यांना त्याच शासनाने किमान त्या राज्यात सोडण्याची व्यवस्था करणे आता आवश्यक झाले आहे. तेलंगणातीचे शासन परराज्यातील नागरिकांना फक्त महाराष्ट्राच्या सिमेवर आणून सोडत आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना या नागरिकांची सोय करण्यासाठी कसल्याच प्रकारचे आदेश नाहीत ना त्यांना पाठवून देण्याचे आदेश नाहीत. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे. राजस्थानच्या तीनशे नागरिकांना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवण्यात आले होते. मात्र त्या नागरिकांची आरोग्य तपासणी सुध्दा करण्यात आली नाही. काही दानशूर व्यक्ती त्यांच्या जेवणाची व्यवस्था ही करतील मात्र त्यांच्या सानिध्यात येणारे कर्मचारी असतील की नागरिक असतील त्यांच्या जवळ सुरक्षिततेसाठी काहीही उपलब्ध नाही. त्यामुळे परराज्यातील नागरिकांना नुसते थांबवून चालणार नाही त्यांची तपासणी व त्यांची सगळी व्यवस्था करण्याची जवाबदारी घ्यावी लागणार आहे. शनिवारी रात्री व रविवारी सकाळी राजस्थानचे तीनशे नागरिक गेले. त्यातील बहुतांश नागरिक शेताशेतानेच गेले. कुठे तर त्यांना अडविण्यात येणारच आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या राज्यात पोहचविण्याची जिम्मेदारी महाराष्ट्र शासनाने घेणे आवश्यकच झाले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!