जिल्हाधिकारी यांच्याकडून खरडपट्टी; जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा
देगलूर दि . २९ मार्च तालुका प्रतिनिधी – व्यवसायानिमित्त तसेच पोटासाठी राजस्थानमधून तेलंगणात गेलेले जवळपास तीनशे नागरिक सिमा पार करित राजस्थानकडे जात असतानाच त्यांना अडवून महसूल प्रशासनाने या नागरिकांची व्यवस्था देगलूरच्या औधोगिक प्रशिक्षण संस्थेत केली आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा ही घेतला तसेच तेलंगणातील संबधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
राजस्थान मधील जयपूर, चित्तोड व नागोर जिल्यातील जवळपास तीनशे नागरिक तेलंगणातील हैदराबाद, कडप्पा, कर्नुल येथून देगलूर मार्ग चालत जात असतानाच महसूल प्रशासनाने त्यांना अडवून त्यांची सोय देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केली. विशेष म्हणजे आपल्या गावाकडे परतण्यासाठी ही मंडळी तेलंगणातून ट्रक व्दारे तेलंगणातील मदनूर पर्यंत आले होते. मात्र त्यांना पुढे जाण्यासाठी ट्रक मध्ये जाता येत नसल्याने राजस्थानचे नागरिक देगलूरात अडकून पडले. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी तात्काळ देगलूर गाठून राजस्थानच्या नागरिकांशी चर्चा केली. जोपर्यंत वरिष्ठांकडून त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासंदर्भात आदेश मिळणार नाहीत तोपर्यंत त्यांना देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रहाण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणातील तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांना व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन राजस्थानचे एवढे नागरिक ट्रक मध्ये कसे येत आहेत. तुम्ही जाणिवपुर्वक आमच्या सिमेवर आणून सोडत आहात का असा प्रश्न विचारुन त्यांना चांगलेच फैलावर घेतले. यानंतर जर राजस्थान अथवा कोणत्याही राज्यातील नागरिक देगलूर येथे आले तर त्यांना तुमच्याकडेच पाठवून देणार असल्याचे सांगितले. राजस्थान मधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था सक्करगा गावातील नागरिकांनी केली होती. महसूल प्रशासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्टोअर रुम स्थापन केली असून दानशूर व्यक्तींनी या नागरिकांच्या जेवणासाठी धान्य द्यावे असे आवाहन स्थानिक महसूल प्रशासनाने केले आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील, वैधकिय अधिक्षक संभाजी पाटील, नायब तहसीलदार वसंत नरवाडे आदिंची उपस्थिती होती. महसूल प्रशासनाने राजस्थानच्या नागरिकांची जवाबदारी दोन नायब तहसीलदार यांच्याकडे दिली आहे.