किनवट दि २७ मार्च तालुका प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात निराश्रीतांसह कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दोन घास मिळावेत,यासाठी येथील साई मंदिराने दातृत्वाच्या भावनेने अन्नदानासाठी पुढाकार घेतला आहे.शिवाय,अन्नदान करताना कोरोनाबाबत सतर्कतेचे आवाहनही करण्यात येत आहे.
येथील साई मंदिर संस्थानच्यावतीने गत ५ वर्षांपासून शहराच्या विविध भागांतील निराश्रीत वृद्धांना नित्य अन्नदान करण्यात येते.अलीकडेच संस्थानने दर गुरुवारी अन्नदान व दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम सुरू केला आहे.सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनचे आदेश आहेत. यामुळे हॉटेल्स,खानावळी बंद आहेत. बंदकाळात २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस,आरोग्य तसेच पालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवण मिळत नाही.अनेक कर्मचाऱ्यांचे जेवण खानावळीवरच अवलंबून आहे.बंदमुळे कर्मचाऱ्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये,म्हणून साई मंदिरने पुढाकार घेतला आहे.मंदिर समितीचे साहेबराव पवार स्वामी हे दुचाकीवर फिरून निराश्रीतांसाेबतच कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे वितरीत करीत आहेत.या दातृत्वासोबतच नागरिकांनी कोरोनाबाबत घाबरू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये,प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन ध्वनीक्षेपकावरून दुचाकीने फिरून करीत आहेत. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
दरम्यान, शहर व परिसरातील कांही दानशुरांनी एकत्र येऊन हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना तांदूळ, डाळींचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.