किनवट दि. २६ मार्च तालुका प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील शेकडो कुटुंबांचा रोजगार बुडत आहे.अशा कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.दरम्यान,जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे.
किनवट शहरात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्थानिक आस्थापना, शेतमजुरी,हमाली,धुणी- भांडी करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांसोबतच दररोज शेकडो मजूर शेजारील तेलंगणाच्या आदिलाबाद येथेही मोल मजुरीसाठी जात असत. कोरोनाचे संकट वाढत चालल्याने सरकारने सर्वत्र लॉकडाऊनचे आदेश दिले.अचानक आलेल्या या आदेशामुळे कष्ट करुन उपजिवीका भागवणाऱ्यांना आता जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला.लॉकडाऊनमुळे घराबाहेर फिरता येत नाही,कामही मिळत नाही,अशा विवंचनेत कष्टकरी असताना केंद्र सरकारने गरीबांना रेशनवर तीन महिने पुरेल इतके धान्य देण्याच्या हालचाली सुरू केल्याने कष्टकऱ्यांना कांहीअंशी दिलासा मिळाला.केंद्र सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर येथील पालिकेच्यावतीने शहरातील रोजगार नसलेल्या अत्यंत गरीब,होतकरू व मजुरदार कुटुंबीयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना सुरू आहेत.संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने व्यापारी आस्थापनासमोर ३ फुटापर्यंत ग्राहकांना उभे राहण्यासाठी वर्तुळ ( लक्ष्मण रेषा ) आखण्यात आली.भाजी विक्रेत्यांनी गर्दी टाळण्यासाठी मंडईऐवजी भाजी हातगाड्यांवर ठेवून गल्लोगल्लीत जाऊन विक्री करावी,अशी सूचना देण्यात आली.पालिका कर्मचाऱ्यांकडून डोअर टू डोअर भेटी देऊन बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तिंची नोंद घेवून आरोग्य विभागास अवगत केले जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी हायपोक्लोराईड या किटकनाशकाची फवारणी केली जात आहे.सर्व परिस्थितीवर सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल,तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,उपनगराध्यक्ष अजय चाडावार,आरोग्य निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांच्यासह पालिका कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.