देगलुर दि २६ मार्च तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील चैनपुर येथील दोन शाळकरी विद्यार्थी गावालगत असलेल्या शेततळ्यात पोहायला गेले असता शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली .ऐन पाडव्याच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चैनपुर गावावर शोककळा पसरली आहे.
चैनपुर वन्नाळी च्या रोडवर पांणद रस्त्याच्या बाजूला मधुसूदन शिवराम औटी यांचे शेत तळे आहे .गावातील किरण यादवराव पाळेकर व बजरंग जमनाजी कायेतवाड( वय 14 ) हे दोघे खानापूर येथील एका खाजगी शिक्षण संस्थेत आठव्या वर्गात शिक्षण घेत होते . बुधवार दि. 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते दोघे औटी यांच्या शेततळ्यात पोहायला गेले होते. त्या शेततळ्यात बाहेरून मोटारीने पाणी सोडल्याने पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात जमला होता. हा अंदाज त्या दोन विद्यार्थ्यांना न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.
चारच्या सुमारास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या शेततळ्याच्या काठावर कोणाचे तरी कपडे असल्याचे आढळून आले असता जवळ गेल्यानंतर शेततळ्यात दोन मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. लागलीच त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले.
पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती समजताच तात्काळ त्यांनी उप पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना पाठवून त्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. ऐन पाडव्याच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चैनपुर गावावर शोककळा पसरली आहे