हदगाव दि २४ मार्च .- तालुका प्रतिनिधी – पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हदगाव शहरातील नागरिकांनी आज जनता कर्फ्युचे तंतोतंत पालन केले. त्यामुळे हदगांव शहरात सर्वत्र शुकशुकाट होता अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
राज्यात व देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे लोकांनी फार मोठी धास्ती घेतलेली आहे. दरम्यान शुक्रवारी आठवडी बाजारात सायंकाळी चार वाजल्यानंतर स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामळे नागरिकांनी खरेदी साठी गर्दी केली होती. जागरूक नागरिकांनी मुख्याधिकारी व तहसीलदारांना संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे थेट उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बाजार बंद केला. त्यामुळे दुसरे दिवशी म्हणजे शनिवारी याचा धडा घेऊन स्वतः उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी रस्त्यावर फिरून संपूर्ण बाजारपेठ लॉकडाऊन केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. ही आजच्या कर्फ्युची झलक होती असे म्हणता येईल.
प्रशासनाच्या आवाहनाला आज नागरिकांनी ऊत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आजचा जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी केला. उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जिवराज डापकर, संजय गोडबोले, प्रभारी मुख्याधिकारी विजय येरावाड, सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक अवधूत कुसे, उपनिरीक्षक मोरे, जि.वी.शा.चे पप्पू चव्हाण, जमादार गायकवाड, ईत्यादींनी शहरात आरोग्य सेवेव्यतिरीक्त विनाकारण कोणीही बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली. नागरिकांनी ऊत्तम प्रतिसाद दिल्या बद्दल ऊपनगराध्यक्ष सुनील सोनूले व गटनेते अमित आडसूळ यांनी सर्वांचे आभार मानले