गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीसाठी रविवारी पुन्हा हायकोर्टात झाली सुनावणी!

  • सुट्टीच्या दिवशी, असे काय होते विशेष कारण?
  • जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक देखील सहभागी
  • राज्य शासनाकडून तातडीने सुनावणीचा विशेष अर्ज
  • मिरवणूक चार तासावर असताना झाली सुनावणी

गोविंद करवा

नांदेड, दि.२५: गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी सशर्त परवानगी दिली होती. परंतु, त्यातील अटीनुसार गुरुद्वारा बोर्डाकडून हमीपत्र मिळाले नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करून राज्य सरकारने रविवारी (दि.२५) सकाळी खंडपीठाकडे धाव घेऊन विशेष विनंती अर्ज सादर केला. त्यावर सुट्टीचा दिवस असतानाही, नियोजित मिरवणूक सुरू होण्याच्या अगदी चार तास शिल्लक असल्याने औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात रविवारी दुपारी १२.३० वाजता पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घेतली.

राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे तातडीने सुनावणी घेण्यासाठी सादर केलेले हेच ते विशेष विनंती पत्र

गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी नाकारल्यानंतर बोर्डाने त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेऊन आपली भूमिका मांडली. राज्याचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह राज्य शासनाचे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील तसेच गुरुद्वारा बोर्डाकडून ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख यांच्या तासभर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अटी व शर्तींना अधीन राहून दसरा मिरवणुकीला परवानगी देण्याचे आदेश दिले होते.

खंडपीठाच्या आदेशानंतर नांदेडला गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीची तयारी सुरू होती. परंतु, बोर्डाकडून हमीपत्र मिळाले नाही आणि त्याशिवाय नियोजित मिरवणूक निघाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या कारणावरून राज्य शासनाने रविवारी खंडपीठाकडे विशेष अर्ज दाखल करून तातडीने सुनावणी घ्यावी आणि सशर्त परवानगीच्या आदेशात दुरुस्ती करून देण्याची विनंती केली.

पोलिस अधीक्षक शेवाळे व बोर्डाचे सचिव बुंगई यांनी मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रकरणाचे गांभीर्य आणि शासनाची विनंती लक्षात घेऊन न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या संयुक्त पीठाने दुपारी १२.३० वाजता ऑनलाईन सुनावणी सुरू केली. राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील राहुल चिटणीस (दिल्ली), महाअधिवक्ता कुंभकोणी यांच्यातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ आशिष शिंदे (मुंबई), गुरुद्वारा बोर्डाकडून ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख व याचिकाकर्ते तसेच बोर्डाचे सचिव स. रवींद्रसिंघ बुंगई, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शेवाळे हे स्वतः नांदेडहून ऑनलाईन सुनावणीस उपस्थित होते.

दसरा मिरवणुकीस परवानगीसाठी खंडपीठाने दिलेल्या अटीनुसार गुरुद्वारा बोर्डाकडून हमीपत्र देण्यात आले नाही, तसेच केवळ सचिव नव्हे तर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेही हमीपत्र हवे, अशी भूमिका राज्य सरकारने यावेळी मांडली. हमीपत्र दिले नाही आणि मिरवणूक निघाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही शासनाने न्यायालयात सांगितले.

मिरवणूक प्रारंभापासून संपण्याच्या ठिकाणापर्यंतच्या मार्गाची पोलिस अधीक्षक शेवाळे आणि सचिव बुंगई यांनी संयुक्तपणे पाहणी केली तसेच सुव्यवस्थेची खबरदारी घेण्याचे मान्य केल्याचे अॅड. राजेंद्र देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी होईपर्यंत सचिव बुंगई यांनी हमीपत्र दाखल केल्याचे सांगून अटींची पूर्तता केल्याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोघेही नांदेडबाहेर असल्याने त्यांचे हमीपत्र तातडीने घेणे शक्य नाही. त्याऐवजी गुरुद्वारा बोर्डाचे स. गुरमितसिंघ महाजन व स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले हे दोन सदस्यदेखील हमीपत्र देतील, असे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले. या तिघांना मिरवणुकीच्या सनियंत्रणाची संयुक्त जबाबदारीसाठी परवानगी द्यावी, अशी विनंतीही बोर्डाच्या वतीने करण्यात आली.

वेळप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही बाबींबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती बोर्डाने केली. त्यावर गुरुद्वारा बोर्ड आणि जिल्हा प्रशासनाने नियम व अटींचे पालन करताना समन्वयाने परिस्थिती हाताळण्यासाठी दक्ष राहावे, असेही न्यायालयाने सांगितले.

मिरवणुकीत आणखी एका ट्रकला परवानगी

मिरवणुकीसाठी न्यायालयाने सशर्त परवानगी देताना दोनपैकी एका ट्रकमध्ये पाच अश्व (घोडे) ठेवण्यास सांगितले होते. परंतु एका ट्रकमध्ये पाच घोडे बसत नसल्याने आणखी एका ट्रकची मिरवणुकीत परवानगी द्यावी, अशी विनंती गुरुद्वारा बोर्डाने सुनावणीदरम्यान केली. न्यायालयाने ती मान्य करताना, नियम आणि अटींचे पालन झाले पाहिजे. एकही व्यक्ती पायी चालणार नाही, त्यात व्हिडिओग्राफरचा देखील समावेश असेल, असे स्पष्ट शब्दात बजावले. त्यामुळे दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० दरम्यान पावणेदोन किलोमीटर अंतराच्या मार्गाच्या या मिरवणुकीत आता तीन उघड्या ट्रकचा व त्यात ठरवून दिलेल्या व्यक्ती व अश्र्वांचा समावेश राहणार आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!