अनावश्यक कोरोना चाचण्यांवर शासनाचे निर्बंध!

  • लक्षणे नसलेल्या व्यापारी व प्रवाशांचे स्वब घेऊ नका
  • अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीसाठी प्रोटोकॉल जारी

गोविंद करवा
नांदेड, दि.२३: उठसुठ बाजारपेठेत जाऊन रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्याच्या मोहिमेला शासनाने ब्रेक लावला आहे. यापुढे लक्षणे नसतील तर व्यापारी व प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करू नयेत, असे निर्देश देतानाच कोणाच्या, कधी व कोणत्या चाचण्या कराव्यात, याचा प्रोटोकॉलदेखील शासनाने निश्चित करून दिला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या सहीने याबाबतचे पत्र आरोग्य यंत्रणा व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये कोवीड रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोवीड संशयितांच्या चाचण्यांसाठी आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन चाचण्यांच्या गणितीय विश्लेषणाअंती मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी व्यक्तीची विभागणी आता तीन गटामध्ये करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणी करणे आवश्यक आहे, अशांची अँटीजेन चाचणी करावी. यामुळे अशा रुग्णांच्या पुढील उपचाराबाबत अर्ध्या तासांत निर्णय घेता येणे शक्य होईल.
मृत्त झालेले व्यक्ती, बाळतंपणासाठी आलेल्या माता अथवा अत्यावश्यक शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांची ट्रू नेट चाचणी करावी. जेथे ही सुविधा उपलब्ध नसेल तेथे अशा व्यक्तींची अँटीजेन चाचणी करावी.
मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना प्रथम १ आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर अँटीजेन चाचणी करावी. तसेच त्यानुसार आयसोलेशन वार्ड किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तुरुंगातील कैद्यांना देखील दाखल झाल्यानंतर १ आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर अँटीजेन चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार आयसोलेशन, कोवीड़ रुग्णालयात संदर्भीत करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे शासनाच्या निर्देशात म्हटले आहे.

फक्त ‘यांचीच’ आरटीपीसीआर चाचणी!
अँटीजेन चाचणीत निगेटिव्ह आलेले व लक्षणे असणारे रुग्ण, पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील उच्च जोखीम गटातील व्यक्ती अथवा परदेशांतून येणाऱ्या व्यक्तींचीच यापुढे आरटीपीसीआर चाचणी करावी, असे सक्त निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.

एका रुग्णांच्या वारंवार चाचण्या नको
बऱ्याच जिल्हयांमध्ये एकाच रुग्णांच्या २-३ चाचण्या करण्यात येतात. यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो आणि शासनाचा आर्थिक भार सुध्दा वाढतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक व्यक्तींची प्रोटोकॉल नुसारच चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करु नयेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. याशिवाय बाहेरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, जिल्हयात दाखल होणाऱ्या व्यक्ती, व्यापारी अशांची त्यांना कोवीड- १९ सदृश्य लक्षणे नसल्यास चाचणी करण्यात येवू नये, असे डॉ. व्यास यांनी आपल्या पत्रात बजावले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!