नांदेडला पहिले खाजगी कोविड रुग्णालय सुरू!

  • भगवती व आशा हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

गोविंद करवा

नांदेड, दि.१२: प्लाझ्मा थेरेपीची मोफत सुविधा सुरू झाल्यानंतर नांदेडकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद किंवा अन्य ठिकाणी खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. अत्यंत किफायती खर्चात नांदेडमध्येच ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला असून आशा हॉस्पिटलच्या संयुक्त सहकार्याने नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यातील बाधित रुग्णांसाठी पहिले खाजगी कोविड रुग्णालय नांदेडला सुरू करण्यात आले आहे. आशा हॉस्पिटलमध्ये भगवती कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली असून यापुढे हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रोटोकॉलचे पालन करून रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे डॉ. अंकुश देवसरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, शनिवारअखेर (दि.१२) ५८५ रुग्णांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. बाधित रुग्णांमध्ये ज्यांना लक्षणे आणि इतर आजारांचा त्रास आहे, असे काही रुग्ण नांदेडमध्ये उपचार न घेता औरंगाबाद, मुंबई, हैदराबाद व इतर महानगरांमध्ये उपचारासाठी जात होते. परंतु काही जणांना तेथे खाटा उपलब्ध होत नव्हत्या. नांदेडला खाजगी कोविड रुग्णालय नसल्याने उपचाराच्या मानकाप्रमाणे औषधी मिळतील की नाही, अशीही काही रुग्णांना शंका वाटत होती. परंतु या काळातही नांदेडमधील काही दवाखाने आजही सर्वोत्तम सेवा देतात, हे अनेकदा दिसून आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केलेल्या सूचनेनुसार नांदेडला हे पहिले खाजगी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे अत्याधुनिक सोयी-सुविधेसह फक्त कोविड रुग्णांसाठी ५० खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया व सुजया यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी नांदेडचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आशा हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये डॉ.अंकुश देवसरकर, डॉ. अनंत सूर्यवंशी, डॉ. गोवर्धन कोळेकर, डॉ. राहुल देशमुख, डॉ.बिपिन भांगडिया, डॉ. श्रीनिवास संगनोर, डॉ. व्यंकटेश द्दुबे, डॉ.श्याम दवणे यांच्यासह इतर तज्ञ डॉक्टरांची टीम कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!