देगलूर : लॉकडाऊनचा फटका : मुंबईहून मुलगा आल्यानंतर पित्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत २४ तासांनी अंत्यसंस्कार


मनोहर देगावकर


देगलूर दि. १२ एप्रिल , राज्यात विशेषत मुंबई व पुणे येथे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देगलूर येथे शुक्रवारी सकाळी वडिलांचे निधन झाले. मुलगा मुंबईला व मुलगी पुण्यात. मुलगा वडिलाच्या अंत्यसंस्कार येतो की नाही या विवंचनेत शुक्रवारचा दिवस गेला. मुंबईहून देगलूर येण्यासाठी जी शासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर चोवीस तासांनी मयत पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मुलगा मुंबई व मुलगी पुण्यातून आल्याने अंत्यसंस्काराला केवळ तेरा जण उपस्थित होते.
भक्तापुर रोडवर सद्गुरु नगर भागातील रहिवासी तथा निवृत्त मुख्याध्यापक किशनराव शंकरराव पांचाळ यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवारी सकाळी साडेअकरा च्या सुमारास निधन झाले. किशनराव पांचाळ यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मुलगा संदिप पांचाळ हा मुंबई येथे म्हाडा येथे कर्मचारी आहेत. दोन मुली पैकी एक मुलगी पुण्यात तर दुसरी देगलूर तालुक्यातच आहे. किशनराव पांचाळ हे काही दिवसापासून आजारी असल्याने एक मुलगी आपल्या पतीसह वडिलाच्या घरी रहायला आली होती. शुक्रवारी सकाळी वडिलाचे निधन झाल्याचे समजताच मुलास धक्काच बसला. मुंबई येथील सध्याची परिस्थिती बघून आपल्याला वडिलाच्या अंत्यसंस्कारास जाता येते की नाही, आपल्याला जाण्यासाठी परवानगी मिळेल का असे एक ना अनेक प्रश्न संदिप यास हैराण करित होते. देगलूर येथे रहाणाऱ्या जावयाने सासऱ्याचे मृत्यप्रमाणपत्र देगलूर नगरपरिषदेतुन काढून मेव्हण्याला पाठवून दिले. पोलीस आयुक्त कार्यालयातून परवानगी मिळते की नाही या विवंचनेत देगलूर येथील काही नातलग होते. मुलास परवानगी मिळाली नाहीतर जावाई अंत्यसंस्कार करेल असे ठरविण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वर्गरथ ही सांगण्यात आले. याच दरम्यान सायंकाळी मुलास पोलीसांकडून देगलूरला येण्यास परवानगी मिळाली. सायंकाळी स्वर्गरथ चालकाने अंत्यसंस्कार केव्हां आहे मी किती वाजता येवू असे संबंधिताना विचारले. तेंव्हा मुलगा मुंबई व मुलगी पुण्याहून आल्यानंतर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुलगा संदिप पांचाळ हा आपल्या पत्नीला व मुलांना सोबत न घेता तो एकटाच मुंबईहुन कारने पुण्याला आला. पुण्यातून बहिणीला घेऊन तो शनिवारी सकाळी देगलूर येथे पोंहचला. मयत मुख्याध्यापक किशनराव पांचाळ हे देगलूर तालुक्यात लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. मात्र त्यांचा मुलगा मुंबई व मुलगी पुण्यातून आल्यामुळे गल्लीतील सोडाच शेजारी सुध्दा त्या ठिकाणी आले नाहीत. अनेक नातेवाईकांनी सुध्दा अंत्यसंस्कारास येण्याचे टाळले. अंत्यसंस्काराची सगळी तयारी झाल्यानंतर स्वर्गरथ चालकास लवकर या म्हणून सांगण्यात आले. अनेक फोन केल्यानंतरही तो स्वर्गरथ घेवून येण्यास तयार झाला नाही. त्यामुळे शहरातील दुसऱ्या स्वर्गरथाच्या चालकास अनेक विनवण्या केल्यानंतर तो स्वर्गरथ घेऊन आला. केवळ कोरोनाच्या भितीपोटी लोकप्रिय असलेल्या पांचाळ यांच्या अंत्यसंस्कारास केवळ तेरा जण उपस्थित होते. शनिवारी साडेअकराच्या सुमारास देगलूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत मृत किशनराव पांचाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.:

नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी घेतली तातडीने घटनेची दखल

जो पर्यंत वडिलांचे मृत्यप्रमाणपत्र मुंबई येथे पाठविण्यात येणार नाही. तोपर्यंत मुलास देगलूरला येण्यास पोलीस परवानगी देणार नव्हते. एका पत्रकाराने नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. तद्नंतर धान्य वाटपाचा कार्यक्रम सोडून नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांनी देगलूर नगरपरिषद गाठून संबंधितास तात्काळ मृत्यप्रमाणपत्र काढून दिल्यानंतरच मुलास शुक्रवारी सायंकाळी देगलूर ला येण्यास परवानगी देण्यात आली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!