परभणी : क्वारंटाईन कक्षात दाखल केलेल्या एका संशयिताने केले पलायन; गुन्हा दाखल


परभणी दि. ११ एप्रिल , प्रतिनिधी – कोरोनाचा फैलाव होवू नये, यासाठी क्वारंटाईन कक्षात दाखल केलेल्या एका संशयिताने ग्रीडवरून पळ काढल्याचा प्रकार ७ एप्रिल रोजी रात्री ११ ते ८ एप्रिलच्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान परभणीत घडला आहे़ या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये संशयित नागरिकावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
कोविड-१९ चा फैलाव होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी शहरातील एका नागरिकाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सरफराज नगर भागातील त्याच्या घरी १ एप्रिल रोजी होम क्वारंटाईन केले होते़ तसेच त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला होता; मात्र या काळातही हा संशयित नागरिक फिरत असल्याची तक्रार नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे त्याला जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शहरातील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या कस्तुरबा गाधी बालिका विद्यालयातील क्वारंटाईन कक्षात ४ एप्रिल दाखल केले होते़ ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्यानंतर या संशयित नागरिकाने वरच्या मजल्यावरील पाठीमागील बाजुने असलेल्या दरवाज्याचे कुलूप तोडून खाली उतरत ग्रीलच्या सहाय्याने तेथून पळ काढला़
ही बाब ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी मधुकर पुर्णेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च कलम ५१ (ब) आणि महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!