अर्धापूर : जिल्ह्यातील सर्व ११६ कोरोना तपासणीचे अहवाल ‘निगेटिव्ह’!- ना.अशोकराव चव्हाण

अर्धापूर येथे घेतला उपाययोजनांचा आढावा, गरजूंना धान्य वाटप


अर्धापूर, दि. ६ एप्रिल , कोरोनाची तपासणी करण्यासाठी आजवर नांदेड जिल्ह्यातून पाठवलेले ११६ नागरिकांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. ही परिस्थिती अशीच कायम ठेवण्यासाठी यापुढेही नागरिकांच्या सहकार्याची आणि शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन होण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
रविवारी दुपारी अर्धापूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील ११६ पैकी १११ नागरिकांचे नमुने ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, उर्वरित पाच नमुने तपासण्याची गरज नसल्याने चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेने म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. परंतु, कोरोनाविरूद्धची लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे पुढील काळातही नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
दरम्यान, अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर येथे कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. राशन कार्डधारकांना शासकीय योजनेप्रमाणे धान्याचे वितरण, राशन कार्ड नसलेल्या नागरिकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत, कोरोना संशयितांची वेळीच तपासणी व त्यांचे विलगीकरण आदींसह आरोग्यसेवेबाबत महत्वपूर्ण सूचना त्यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे राशन कार्ड नसलेल्या गरजू नागरिकांसाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्थांकडून संकलित केलेल्या धान्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!