भोकर दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील बटाळा शेत शिवारात बांधून ठेवलेल्या कालवडीस वन्य हिंस्र प्राणी बिबट्याने फस्त केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बटाळा येथील शेतकरी बालाजी विठ्ठलराव नरवाडे यांनी शेत गट क्र. ११२ मध्ये आपली पाळीव जनावरे नेहमीप्रमाणे बांधून ठेवली होती. दरम्यान सोमवारी रात्री केंव्हा तरी वन्यप्राणी बिबट्याने यातील कालवडीची शिकार केली. मंगळवारी सकाळी शेतकरी बालाजी नरवाडे शेतावर गेल्यानंतर एक कालवड दिसून आली नाही. यामुळे परिसरात शोधाशोध केली असता सायंकाळी त्याच शिवारात मृत अवस्थेत कालवड मिळून आली. याघटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचा शिरकाव होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.