नांदेड नंतर मुखेड मध्ये ५० खाटांचे कोव्हीड रुग्णालय ; १० एप्रिल पासून होणार उपचार सुरु .-आ.डॉ. तुषार राठोड यांची माहिती.

शिवाजी कोनापूरे


मुखेड दि. १ एप्रिल , -कोरोना विषाणूचा पादुर्भाव देशभरात वेगाने पसरत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. याच अनुषंगाने मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाटांचे कोव्हीड सेंटर उभारण्यात येत असून येत्या १० एप्रिल पासून कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणारे हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती आ.डॉ. तुषार राठोड यांनी दिली.
राज्यभरात इतर राज्याच्या तुलनेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. या आजाराचे रुग्ण मराठवाड्यात अद्यापही आढळले नसले तरीही राज्य शासनाकडून व आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात आहेत. मुखेड येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय अनेक वर्षापासून कार्यान्वित आहे. या रुग्णालयाची निवड जिल्ह्यातील नांदेड जिल्हा रुग्णालयानंतर दुसरे कोव्हीड सेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य सहसंचालक डॉ. सतीश पवार यांच्याकडे मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड सेंटर उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे.
आरोग्य सहसंचालक डॉ. सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काल लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले व आ.डॉ.तुषार राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी रुग्णालयातील कोव्हीड सेंटरची पाहणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील १६ बेड हे कोरोना संशयित रुग्णासाठी ठेवण्यात आले आहेत तर २० बेड हे कोरोना बाधित रुग्णासाठी तर ६ बेड अतिदक्षता विभाग म्हणून अतिगंभीर रुग्णासाठी तयार करण्यात आले आहेत. अनेक वर्षापासून मुखेड शहरातील अतिदक्षता विभाग बंद अवस्थेत होते या कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून हे अतिदक्षता विभाग कार्यान्वित होणार आहे. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलताना आ. डॉ. तुषार राठोड म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा मागील इतिहास आदर्श नाही हा इतिहास पुसण्याची वेळ आली आहे, यास आपण संधी म्हणून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर डॉ.एकनाथ माले यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णावर उपचार करताना काय काळजी घ्यावी व कसे उपचार द्यावेत यावर मार्गदर्शन केले.
यावेळी शंभर खाटाच्या रुग्णालयाला दोन विभागात वर्गीकरण करण्यात आले असून, पन्नास बेड हे कोरोना बाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत असून यासाठी बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लखमावार यांची कोरोना सेंटरची युनिट हेड म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर हे या कोव्हीड रुग्णालयासाठी मॉडेल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कोव्हीड सेंटरसाठी दोन एमडी फिजिशियन, दोन भूलतज्ञ व दोन बाल रोग तज्ञांची प्रतिनियुक्ती या कोव्हीड सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक आमदार निधीतून नविन चार व्हेंटिलेटर मशीन, दोन मॉनिटर,सीपॅक, बायपॅक, पल्स ऑक्सीलेटर व डिजिटल एक्स-रे मशीन अश्या अद्यावत उपकरणांची खरेदी पुढील दहा दिवसात करण्यात येणार आहे, यासाठी स्थानिक आमदार निधीतून ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. डॉ. तुषार राठोड यांनी दिली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागास कोव्हीड सेंटरमधील काही लहान सहान दुरुस्त्या करून त्रुटी दूर करण्याचे सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. मुखेड शहरात कोव्हीड सेंटर उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, तहसीलदार काशिनाथ पाटील मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे पोलीस निरीक्षक नरसिंग आकोसकर ,पं.स. सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर, माजी नगराध्यक्ष अनिल जाजू,न.पा. गटनेते चंद्रकांत गरुडकर, जगदीश बियाणी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र,हिमगिरे, शहराध्यक्ष आशोक गजलवाड, किशोरसिंह चौहान, विनोद दंडलवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!