कंधार,दि. ३०. मार्च, तालुका प्रतिनिधी – तेलंगणा राज्यात मोल मजुरी साठी गेलेल्या कंधार व लोहा तालुक्यातील नागरिकांवर लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली होती याची माहिती कंधार-लोह्याचे आ.शामसुंदर शिंदे यांना मिळताच त्यांनी तात्काळ तेलंगणा तेथील जिल्हाधिकारी बी.पी.गुप्ता यांच्याशी बोलून कंधार, लोह्यातील तीनशे मजुरांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
कंधार-लोहा मतदार संघातील हजारो नागरिक महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सह परराज्यातील मोठ्या शहरांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी व कामधंद्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असतात. यावर्षी दीपावली नंतर परराज्यात कामधंद्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती. जागतिक स्तरावर व देश पातळीवर कोरोना या महाभयंकर रोगाने हाहाकार केलेला असल्याने यास रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसासाठी लॉकडाऊन सह संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केल्याने, दि.१४ एप्रिल पर्यंत नागरिकांनी आहेत तेथेतच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोहा- कंधार तालुक्यातील जवळपास तीनशे मजूर तेलंगणा राज्यातील महेबूब नगर जिल्ह्यामध्ये अडकलेले आहेत. लॉक डाऊन मुळे जवळपास २१ दिवस काम धंदा नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असल्याने खायचे काय, जगायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. त्यातच त्यांच्यातील काही मजुरांनी व त्यांच्या नातेवाईकांनी कंधार – लोहा मतदार संघाचे आ. शामसुंदर शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून त्यांच्या अडचणी सांगितल्या व आम्हाला नांदेडला येण्यासाठी किंवा येथेच राहण्याची व जेवण्याची सोय करण्याची विनंती केली.
अत्यंत तत्परतेने आ. श्यामसुंदर शिंदे यांनी तेलंगणा राज्यातील महबूब नगरचे जिल्हाधिकारी बी.पी.गुप्ता व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रिया शाय मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन बोलून महबूब नगर येथे कंधार व लोहा तालुक्यातील जवळपास तीनशे नागरिक अडकून पडले असल्याचे सांगितले. हे लोक मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने त्यांची आपल्या शासनाच्या वतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी अशी विनंती महेबुब नगरचे जिल्हाधिकारी गुप्ता यांना आ. शिंदे यांनी केली. जिल्हाधिकारी बी.पी. गुप्ता व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रिया शाय मॅडम यांनी अडकून पडलेल्या तीनशे मजुरांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्या जाईल असे सांगितले. त्यामुळे महबूबनगर मध्ये अडकलेल्या तीनशे मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.