किनवट : अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या भोजनाची प्रदीप चाडावार यांनी उचलली जबाबदारी !


किनवट दि. २९ . मार्च, तालुका प्रतिनिधी- लॉकडाऊनमुळे किनवट येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या भोजनाची जबाबदारी येथील मूळ रहिवाशी तथा सध्या नांदेडमध्ये वास्तव्य करणारे उद्योजक प्रदीप चाडावार यांनी उचलली असल्याची माहिती तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिली.
कोरोना (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. अशाच प्रकारे तेलंगणातून एका ट्रकने अवैध वाहतूक करणाऱ्या गुजरात व राजस्थानमधील ३८ मजूरांना किनवट पोलिसांनी किनवट तालुक्यातील महाराष्ट्र -तेलंगाणा सीमा असलेल्या घनपूर नाका येथे ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक मारूती थोरात यांनी त्यांना तहसील कार्यालयात आणले. तिथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बोमकुंटीवार, डॉ.झडते, डॉ. दत्ता नरवाडे, डॉ.गजानन काळे यांनी त्यांची तपासणी केली. स्वामी साहेबराव पवार यांनी सर्वांना जेवण दिले.
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी चालक,क्लिनरसह त्या ४० जणांना छत्रपती शिवाजी नगर परिषद मंगल कार्यालयात नेले. तिथे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी निवासी सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दोन दिवसाच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
अडकून पडलेला कुणीही मजूर, प्रवाशी उपाशी राहू नये, यासाठी दानशूर व्यक्तिनीं मदत करावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मूळ रहिवाशी तथा सध्या नांदेडमध्ये वास्तव्य करणारे उद्योजक प्रदीप चाडावार यांनी हे परप्रांतीय मजूर जेवढे दिवस राहतील, तोपर्यंत एकवेळ चहा, दोन वेळा जेवण व प्रत्येकास हँडवॉश देण्याची जबाबदारी उचलली आहे. अशाच प्रकारे दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन हातावर पोट असणारे व निराधार यांच्यापर्यंत अन्न,धान्य पोहचवावे, असे आवाहन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!