हदगांव: आम्हाला कोरोनाची नाही तर फक्त शेतकरी विरोधी कायद्याची भिती

शेतक-यांचे बाजार समितीत संवेदनशिल वक्तव्य


हदगाव दि.17 मार्च –आम्हाला कोरोनाची भीती अजिबात नाही. आम्हाला भीती आहे फक्त शेतकरी विरोधी कायद्याची. शासनाने आम्हाला कोरोना पासून बचाव कसा करायचा आहे हे न शिकवता सरकारने आमच्या शेतीमालाला योग्य दरात खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा प्रतिक्रिया हदगाव येथे हरभर्‍याची विक्रीकरीता नाफेडकडे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. दरम्यान उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हरभरा खरेदीची नोंदणी एकत्रित न घेता प्रत्येक मंडळात नोंदवून घेवून गर्दी टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला.
चीन देशातून ऊद्भवलेल्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याची तयारी सरकार करीत असले तरी ग्रामीण भागातील बँका, खरेदी विक्री संघ, बाजार समित्या इत्यादी ठिकाणी अनाहुत गर्दी होत आहे. अशी सुचना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे विभागीय अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी उपविभागीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून आठवडी बाजार व इतर गर्दीचे ठिकाणी अनावश्यक गर्दी होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येत आहे असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
नुकतेच शेतकर्‍यांचा हरभर्‍याचे पिक शेतातून घरी आले आहे. शेतकर्‍यांना दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी पैशाची निकड असलेले शेतकरी हरभरा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत परंतु खुल्या बाजारात हरभर्‍याचा भाव तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे व शासकीय हमीभाव तीन हजार नऊशे रुपये आहे. आपले प्रती क्विंटल सातशे रुपये नुकसान टाळण्यासाठी या हरभर्‍याची शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. अशी नोंदणी करण्याकरीता हदगांव तालुक्यातील शेतकर्‍यांनीआज हदगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावर काय निर्णय घ्यावा यासाठी संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी महेश वडदकर व जिल्हा उपनिबंधक फडणीस यांचे मार्गदर्शन घेतले. यावेळी संचालक मंडळासोबत उपविभागीय अधिकारी यांनी बैठक घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करून घेण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत वडदकर यांनी सांगितले की कोरोणाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कुठेही पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच शुक्रवारचा आठवडी बाजार सुद्धा बंद करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!